भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ( MS Dhoni) चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक घडामोडींवर चाहत्यांच बारीक लक्ष असते आणि त्यामुळेच २५ जूनला चाहत्यांनी ट्विटरवर त्याचे नाव ट्रेंड सुरू केला. विशेष म्हणजे धोनीच्या नावासोबत मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 'कँडी क्रश' या ऑनलाइन मोबाइल गेमही ट्रेंडमध्ये आला. धोनी आणि कँडी क्रश एकत्र का ट्रेंड होत आहेत याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळे हा ट्रेंड सुरू झाला. या व्हिडीओत एअर होस्टेस फ्लाइटमध्ये MS Dhoniला चॉकलेट्स देताना दिसतेय, परंतु चर्चा वेगळ्याच गोष्टीची सुरू झाली.
कँडी क्रश खेळताना धोनीच्या व्हायरल व्हिडिओनंतर, इंटरनेटवर आणखी एक घटना घडली. एका ट्विटने लक्ष वेधले, "जस्ट इन - आम्हाला फक्त ३ तासांत ३.६ दशलक्ष नवीन डाउनलोड मिळाले. भारतीय क्रिकेट लीजेंड dhoni चे आभार. आम्ही फक्त तुमच्यामुळे भारतात ट्रेंड करत आहोत. #Candycrush #MSDhoni ~ टीम कँडी क्रश." असे या ट्विटमध्ये लिहिले होते. पण, हे ट्विटर अकाउंट अधिकृतपणे कँडी क्रशचे नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.