पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफान याच्या मृत्यूच्या चर्चा रविवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) रविवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं आणि त्यावरून हा गोंधळ सुरू झाला. नेटकऱ्यांनी पीसीबीचं ते ट्विट नीट वाचलं नाही आणि त्यामुळे मोहम्मद इरफानच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर स्वतः गोलंदाज मोहम्मद इरफाननं स्पष्टिकरण देत आपण जीवंत असल्याचे सांगितले.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक उंच क्रिकेटपटू म्हणून इरफान ओळखला जातो. तो 7 फुट 1 इंचाचा आहे. रस्ता अपघातात त्याचं निधन झाल्याची चर्चा सुरू होती आणि यात तथ्य नसल्याचं त्यानं सांगितले. ''सोशल मीडियावर माझ्या निधनाची चुकीची आणि तथ्यहीन बातमी पसरवली जात आहे. त्यानं माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. माझा फोन सतत वाजत आहे. माझा कोणताही अपघात झालेला नाही आणि मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे,''असे इरफाननं ट्विट केलं.