दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत मानहानीहारक पराभव पत्करावे लागल्यानंतर भारतीय संघानं दोन मोठ्या विजयांची नोंद केली. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवत भारतानं आपलं आव्हान कायम राखलं आहे. भारतानं अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवत नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा केली. मात्र या सामन्यात फिक्सिंग झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
भारत वि. अफगाणिस्तान सामना फिक्स असल्याचा दावा पाकिस्तानमधील सोशल मीडिया हँडल्सवरून करण्यात येत आहे. त्यासाठी नाणेफेकीच्या वेळचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानचा कर्णधार नबीनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, असा दावा करण्यात येत आहे. नबीनं टॉस जिंकल्यानंतर विराट कोहली काय म्हणतो ते नीट ऐका, तो म्हणाला, तुम्ही प्रथम गोलंदाजी करा, असा दावा पाकिस्तान संघाचे समर्थक करत आहेत.
सत्य काय?
या व्हिडीओ सत्यता पडताळून पाहिली असता, तो दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं. नाणेफेकीचा व्हिडीओ नीट पाहिला असता, त्यात नबी नाणेफेक जिंकल्यावर विराटला अफगाणिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करेल असं सांगताना दिसत आहे. क्रिकेटमधील आचारसंहिता लक्षात घेतल्यास, नाणेफेक जिंकणारा कर्णधार दुसऱ्या कर्णधाराला त्याचा संघ आधी गोलंदाजी करणार की फलंदाजी ते सांगतो.
व्हिडीओत नेमकं काय?
डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत वि. अफगाणिस्तान सामन्याच्या नाणेफेकीचा व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यात अडीच मिनिटं होत असताना विराट नाणं हवेत उडवताना दिसतो. नबी हेड्स म्हणतो. पंच अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकल्याचं जाहीर करतात. यानंतर नबी आणि कोहली हात मिळवतात. आम्ही प्रथम गोलंदाजी करू, असं नबी स्पष्टपणे म्हणतो. त्यावर कोहली ओके म्हणतो. विशेष म्हणजे इतर सगळ्या सामन्यांमध्येही असंच घडलं आहे. २९ ऑक्टोबरला दुबईत अफगाणिस्तान वि. पाकिस्तान सामना रंगला. त्यावेळीही नबीनं नाणेफेक जिंकली. आपला संघ प्रथम फलंदाजी करणार असल्याचं नबीनं बाबर आझमला सांगितलं होतं.
Web Title: Fact Check Virat Kohli did not ask Afghan captain to choose bowling after toss in a T20 match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.