India vs Australia : भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जो खेळ केला, तो पाहून सर्वच अवाक् आहेत. गॅबावरील अविश्वसनीय विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे बरेच आजी-माजी खेळाडू सदम्यात गेले आहेत. अॅडलेडवरील पराभवानंतर अनेकांनी ऑस्ट्रेलिया ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकेल असा दावा केला. विराट कोहली ( Virat Kohli)च्या अनुपस्थितीत टीम इंडिया दुबळी झालीय, असेही अनेकांचे म्हणणे होते. पण, गॅबा कसोटीनंतर ती सर्व मंडळी तोंडावर पडली. यात ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग ( Ricky Ponting) याचाही समावेश आहे. भारताच्या विजयानंतर पाँटिंग स्तब्ध झाला आहे आणि भारताच्या अ संघाकडून कसे पराभूत झालो, हे तो शोधत आहे.
ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले आणि चार कसोटी सामन्यांची मालिका २-१अशी जिंकली. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता आणि रिषभ पंतनं धमाकेदार खेळी करून त्यावर कळस चढवला. टीम इंडियाच्या या विजयानं अनेकांना धक्के दिले. पाँटिंगनेही हा पराभव मान्य केला आणि टीम इंडियाच या विजयाची खरी हकदार होती, असे सांगितले.
क्रिकेट.कॉमशी बोलताना पाँटिंग म्हणाला,''ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकता आली नाही, हे पाहून मी स्तब्ध आहे. हा तर भारताचा अ संघ होता आणि कमकुवत संघाकडून ऑस्ट्रेलिया कशी हरली? मागील पाच-सहा आठवड्यांत टीम इंडियानं ज्या संकटांचा सामना केला, ते पाहता हा विजय अविस्मरणीय आहे. कर्णधार मायदेशी परतला आणि दुखापतग्रस्त खेळाडूंसह टीम इंडिया लढली. ऑस्ट्रेलियातर संपूर्ण मजबूत संघासह मैदानावर उतरली होती.''
''हा भारताचा दुसऱ्या फळीतीलही संघ नव्हता. यात भुवनेश्वर कुमार किंवा इशांत शर्माही नव्हते. रोहितही शेवटच्या दोन सामन्यांत खेळला. टीम इंडियान शानदार खेळ केला. कसोटी क्रिकेटच्या सर्व महत्त्वाच्या क्षणांचा त्यांनी फायदा घेतला, जे ऑस्ट्रेलियाला करता आलं नाही. दोन संघांमधील हा फरक आहे आणि भारत या विजयाचे हकदार आहे,''असेही पाँटिंग म्हणाला.
या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रिकी पाँटिंगनं ऑस्ट्रेलिया ४-० अशा फरकानं टीम इंडियाला लोळवेल असा दावा केला होता. पण, अजिंक्य रहाणेच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियानं मेलबर्न कसोटी जिंकून त्याचा दावा फोल ठरवला. त्यानंतर सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया २०० धावाही करणार नाही, असेही पाँटिंगनं ट्विट केलं होतं. रिषभ पंतनं जोरदार फटकेबाजी करून त्याला इथेही तोंडावर पाडले आणि टीम इंडियानं तो सामना अनिर्णित राखला. पाँटिंगच नव्हेतर मार्क वॉ, अॅलेन बॉर्डर, मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडीन या ऑसी खेळाडूंसह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानंही भारताचा ०-४ असा पराभव होईल, असा दावा केला होता.
Web Title: Fact is India A played this Test and still managed to win it,” says Ricky Ponting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.