Join us  

सचिनच्या बंगल्याविषयी हे तुम्ही कधी वाचलं नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 6:25 PM

Open in App
ठळक मुद्देसचिन तेंडूलकरने 2007 साली हा बंगला घेतला तरीही तो त्यानंतर 4 वर्षांनी गृहप्रवेश केला. या बंगल्याची किंमत कोटींमध्ये आहे. शेवटी तो मास्टर-ब्लास्टरचा बंगला आहे.या बंगल्याचा इंश्यूरंस तर बंगल्याच्या किंमतीपेक्षा जास्त आहे.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी आपण याआधी बरंच काही ऐकलं-वाचलं आहे. त्याचा जीवनप्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. त्याने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आता जगात क्रिकेटमधला देव माणूस म्हणून ओळखला जातो. 2016 साली जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर म्हणूनही त्याची गणना केली गेली. त्याच्या या कारकिर्दीमुळे तो अनेक प्रोडक्टचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरही आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबईत वांद्र्‍यातील पेरी क्रॉस रोडवर त्याने स्वत:चं हक्काचं घर घेतलं. ११ जून 2011 साली त्यांनी गृहप्रवेश केला, ज्या घराची किंमत जवळपास ७९ कोटींच्या घरात आहे. आज सचिन तेंडूलकरच्या या घराविषयीच आपण पाहणार आहोत.

१९२० काळातला बंगला

सचिन तेंडूलकरने 2011 साली बंगल्यात गृहप्रवेश केला असला तरीही तो बंगला खूप जुना आहे. एका पारसी इसमाने तो 1920 साली बांधला होता. 2007 साली सचिन तेंडूलकरने दोराब कुटुंबाकडून 40 कोटींना हा बंगला विकत घेतला. त्यानंतर बंगल्याची नव्याने बांधणी करण्याकरता 39 कोटी रुपये खर्ची घातले. म्हणजे तब्बल 79 कोटीचा हा बंगला आहे.

२०११ साली गृहप्रवेश

सचिन तेंडूलकरने 2007 साली हा बंगला घेतला तरीही तो त्यानंतर 4 वर्षांनी गृहप्रवेश केला. या मधल्या काळात बंगल्याची नव्याने बांधणी सुरू होती.  गृहशांती आणि वास्तू शांती करूनच सचिनने गृहप्रवेश केला. 

अंजली तेंडूलकरच्या देखरेखीखाली बंगला

सचिनचा बंगला मेक्सिकन आर्किटेक्ट जेव्हिअर सेनॉसिअन यांनी बांधला आहे. हा बंगाल बांधून झाल्यावर या आर्किटेक्टचरला अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या. या संपूर्ण बांधकामावर अंजली तेंडूलकर यांचं बारीक लक्ष होतं. सजावटीचं सामान आणण्यापासून ते घरातील इलेक्ट्रीक वस्तू आणण्यापर्यंत सगळंकाही अंजली यांनीच केलं. 

भलामोठा पार्किंग लॉट

सचिन तेंडूलकरला त्याच्या कारकिर्दीत अनेक बक्षिसे मिळाली आहेत. त्यामध्ये अनेक गाड्यांचाही समावेश आहे. आता एवढ्या गाड्या ठेवायच्या म्हणजे तेवढी जागा असालयाच हवी. त्यामुळे सचिन तेंडूलकरच्या बंगल्यामध्ये जवळपास 40 ते 50 गाड्या उभ्या राहतील एवढा पार्किंगचा विभाग आहे. 

बंगल्याला गोगलगायचा आकार

या बंगल्याची खासियत तुम्हाला माहितेय? या बंगल्याची खासियत अशी की, या बंगल्याची संपूर्ण रचना एखाद्या गोगलगाय प्रमाणे केली आहे. म्हणजेच गोगलगायच्या आकाराप्रमाणे हा बंगला बांधण्यात आला आहे.

अंडरग्राऊंड फ्लोअर

हा बंगला पाच माळ्यांचा असला तरीही दिसताना तो तीन माळ्यांचा दिसतो. याचं कारण माहितेय? याचं कारण असं की पहिले दोन मजले जमिनी खाली आहेत. म्हणजेच अंडरग्राऊंड फ्लोअर या बंगल्यात बांधण्यात आले आहेत. 

आधुनिक सुविधांनी सज्ज बंगला

तळमजल्यावर ड्रॉईंग रुम, डाइनिंग रुम, गणपतीचं छोटंसं मंदिर आणि आजवर सचिन तेंडूलकरला मिळालेली सगळी बक्षिसं ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला एक प्रशस्त हॉल. या हॉलची रचनाही अशा प्रकारे करण्यात आली जेणेकरून गणपतीच्या मंदिरापासून हॉलमधली सगळी बक्षिसं दिसू शकतील. पहिल्या माळ्यावर गेस्ट रुम आहे. त्याच्या वरच्या मजल्यार अत्याधुनिक स्वंयपाक घर, नोकरांची खोली आणि सिक्युरिटी रुम बांधण्यात आली आहे. दुसरा मजला मुलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या मजल्यावर मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा हे दोघं राहतात. त्यांच्यासाठी मजल्यांवर खेळण्याची विविध साधनंही ठेवण्यात आली आहे. सगळ्यात वरच्या मजल्यावर सचिन तेंडूलकरची बेडरुम आहे. संपूर्ण बंगल्यात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. जेणेकरून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवता येईल. 

१०० कोटींचा इन्शुरन्स

या बंगल्यासाठी सचिनने 100 कोटींची इन्शुरन्स घेऊन ठेवला आहे. त्यातही फायर इन्शुरन्स पॉलिसीसाठी 75 कोटी तर, इतर अपघातासाठी 25 कोटींचा इन्शुरन्स काढून ठेवण्यात आला आहे. 

आणखी वाचा - सचिनच्याआधी या खेळाडूची जर्सी झाली आहे रिटायर

टॅग्स :सचिन तेंडूलकरअंजली तेंडुलकरमुंबईक्रिकेट