SAT20 ( Marathi News ) दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगच्या ३४व्या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जच्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. सुपर किंग्जने चमकदार कामगिरी करत MI केपटाऊनचा १० गडी राखून पराभव केला. तुफानी शैलीत फलंदाजी करताना फॅफ ड्यू प्लेसिसने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले, त्यामुळे सुपर किंग्जने केवळ ३४ चेंडूतच लक्ष्य गाठले.
पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात जॉबर्ग सुपर किंग्जला डकवर्थ लुईस नियमानुसार ८ षटकांत ९८ धावांचे लक्ष्य मिळाले. सुपर किंग्जची सलामी जोडी ड्यू प्लेसिस आणि ल्यूक डू प्लॉय यांनी झंझावाती पद्धतीने डावाची सुरुवात केली आणि भरपूर चौकार व षटकार ठोकले. यावेळी केपटाऊनचा कर्णधार किरॉन पोलार्ड वेळ वाया घालवत असल्याने फॅफ त्याच्यावर भडकला होता.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना, एमआय केपटाऊनला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन आणि रायन रिकेल्टन यांनी तुफानी सुरुवात केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४.४ षटकांत ३१ धावा जोडल्या. व्हॅन डेर ड्यूसेन १६ धावा करून बाद झाला, तर रिकेल्टन २३ धावा करून इम्रान ताहिरचा बळी ठरला. कर्णधार किरॉन पोलार्डने १० चेंडूत ३३ धावा केल्या. पोलार्डने १ चौकार आणि ४ दमदार षटकार ठोकले.