दक्षिण आफ्रिकसाठी भारत दौरा हा एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांचा सुफडा साफ झाला. त्यांना तीनही सामन्यांत टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्यापैकी दोन सामने तर भारतानं डावाच्या फरकानं जिंकले. या मालिकेत टॉस हा निर्णायक ठरला. आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिसला तीनही सामन्यांत टॉस जिंकता आला नाही. मुख्य म्हणजे मागील अनेक सामन्यांत नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागलेला नव्हता. म्हणूनच फॅफनं शनिवारी अजब मागणी केली आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आफ्रिकन संघ मायदेशात परतला आहे. तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत फॅफ म्हणाला,''प्रत्येक कसोटीत टीम इंडिया प्रथम फलंदाजी करायचा, 500 धावा करून अंधुक प्रकाशात डाव घोषित करायचा. त्याचा फायदा उचलून आमचे तीन विकेट झटपट गुंडाळून टाकायचे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डावाची सुरुवात करताना दडपण यायचे. तीनही कसोटीत हेच कॉपी-पेस्ट होत राहिले.''
तीनही कसोटी सामन्यांत नाणेफेकीचा कौल गमावणाऱ्या फॅफनं कसोटी क्रिकेटमधून टॉस उडवणेच बंद करा, अशी अजब मागणी केली. तो म्हणाला,'' कसोटी क्रिकेटमध्ये टॉस उडवून नका. पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीची संधी द्या. दक्षिण आफ्रिकेत असे करण्यास माझी काहीच हरकत नाही. आम्ही हिरव्या खेळपट्टीवर कधीही खेळू शकतो.''
जे कोणालाच जमलं नाही, ते भारतीय संघाने करून दाखवलं
भारताने यापूर्वी वेस्ट इंडिजवर मालिका विजय मिळवला होता. आता घरच्या मैदानात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानासह भारताच्या खात्यामध्ये पाच सामन्यातील पाच विजयांसह तब्बल 240 गुण जमा झाले आहेत, अशी कामगिरी करणार भारत पहिला संघ ठरला आहे. कारण आतापर्यंत एकाही संघाला आपल्या गुणांचे शतकही पूर्ण करता आलेले नाही. भारतानंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या नावावर 60 गुण जमा आहेत.
Web Title: Faf du Plessis urges coin toss to be done away; says toss to be removed from Test matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.