चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या इतिहासात CSKला प्रथमच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद व्हावे लागले. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या खेळाडूंनी निराश केले असले तरी काही सकारात्मक बाजूही त्यांच्या बाजूनं घडल्या आहेत. फॅफ ड्यू प्लेसिसनं फलंदाजी व क्षेत्ररक्षणात स्वतःचा दबदबा दाखवून दिला. ऋतुराज गायकवाड, सॅम कुरन हे युवा खेळाडू CSKला सापडले. रवींद्र जडेजाचा फॉर्म परतला आहे. पण, या सर्वात दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस उजवा ठरला. IPL गाजवल्यानंतर फॅफ आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे.
फॅफ PSLमध्ये पदार्पण करणार आहे, तर त्याच्यासह २१ परदेशी खेळाडू सहभाग घेणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे PSL चे प्ले ऑफ सामने पुढे ढकलण्यात आले होते. आता १४ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत प्ले ऑफचे सामने होणार आहे. फॅफ ड्यू प्लेसिस पेशावर झाल्मी संघात किरॉन पोलार्डच्या जागी खेळणार आहे. फॅफ म्हणाला,''पीएसएलच्या प्ले ऑफसाठी पेशावर झाल्मी संघासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. ICC World XIसंघाचे प्रतिनिधित्व करताना २०१७मध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्याच्या आठवणी ताज्या झाल्यात. मला खात्री आहे, याही वेळेस चांगल्या आठवणी सोबत घेऊन जाईन.''