कोलकाता: आरसीबीकडून एलिमिनेटरमध्ये झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याने आपला संघ मधल्या षटकांमध्ये उत्तुंग फटकेबाजीत अपयशी ठरल्याची कबुली दिली आहे.
सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला,‘ मधल्या षटकात किमान दोन उत्तुंग फटके मारल्यामुळे सामन्याचे चित्र पालटू शकले असते. मागोवा घेतल्यानंतर असे जाणवते की चौकार-षटकार मारण्यात आमचा संघ कमी पडला. ‘पॉवरप्ले’च्या सात षटकानंतर राहुलने केवळ एकच चौकार मारला. जगातील कुठल्याही गोलंदाजाला फोडून काढण्याची त्याच्यात क्षमता असताना तो असा का खेळला,असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. राहुलने या सत्रात दोन शतके आणि चार अर्धशतके ठोकली. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने वेगवान धावा काढण्यासाठी आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. लक्ष्य गाठताना लखनौने सातपैकी पाच सामने गमावले हे विशेष. राहुल पुढे म्हणाला,‘आम्ही काही सामने जिंकले पण लक्ष्य गाठताना यश आले नाही. यातून बोध घ्यावा लागेल.
माझ्यासाठी अन्य सत्रासारखे हे सत्र यशस्वी ठरले. सांघिकदृष्ट्या मात्र आव्हानांवर मात करण्यात अपयशी ठरलो.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करणार असलेल्या राहुलने १५ सामन्यात ६१६ धावा केल्या. कालच्या सामन्याबाबत तो म्हणाला,‘ आरसीबीविरुद्ध खेळताना मागचे १४ सामने आणि त्यातील धावा विसरलो होतो. पराभवातून मात्र बरेच काही शिकता आले. आम्ही चौकार- षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही, असे नव्हे, गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला. हर्षलने दोन षटकात केवळ आठ धावा देत आमच्यावर दडपण आणले होते.
गचाळ क्षेत्ररक्षणाने घात :
‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे घात झाला. संघाची वाटचाल कठीण झाली. आम्ही अनेक सोपे झेल सोडले. मी स्वत: दिनेश कार्तिकचा झेल सोडला. त्यावेळी त्याने दुहेरी आकडा देखील गाठला नव्हता. रजत पाटीदारला जीवदान दिले. यानंतरही २०८ धावांचा टप्पा सर करण्याचे संपूर्ण प्रयत्न केले. पण दोन मोठे फटके मारू शकलो नाही याची खंत आहे.’ - लोकेश राहुल
राहुलने मोडला गेल, वाॅर्नरचा विक्रम ; ४ वेळा ६०० वर धावालखनौचा कर्णधार लोकेश राहुल हा आयपीएलाच्या चार सत्रात ६०० वर धावा काढणारा पहिला फलंदाज बनला. सलग पाचवेळा ५९० धावा काढणारादेखील तो पहिला फलंदाज ठरला. ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी तीन-तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. गेलने २०१२ ला १५ सामन्यात सर्वाधिक ७३३ धावा तर वॉर्नरने २०१७ मध्ये १७ सामन्यात सर्वाधिक ८४८ धावा केल्या होत्या. राहुलच्या कामगिरीवर एक नजर...