इंदूर : खेळपट्टी कशीही असू दे आपल्याला आपले काम करावेच लागेल. मालिकेतील एखादा सामना विरोधात जाऊ शकतो याची आधीपासून कल्पना होती. एखादा असा सामना येतोच मात्र काही खेळाडूंनी उभे राहून संघाला अशा परिस्थितीतून बाहेर काढले पाहिजे. आम्ही रणनीती कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलो, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने दिली. अशा आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळताना धाडसी राहावे लागते, असे सांगून रोहित पुढे म्हणाला, ‘नाथन लायनला विजयाचे श्रेय द्यावेच लागेल. मला वाटते की आम्ही त्यांच्या गोलंदाजांना एका टप्प्यावर गोलंदाजी करण्याची मुभा दिली.
ती चर्चा खासगी होतीपुजाराची संथ खेळी पाहून रोहित पुरता वैतागला होता. त्याने इशान किशनमार्फत आक्रमक फटकेबाजी करण्याची सूचना केली. हा क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. यावर स्पष्टीकरण देताना रोहित म्हणाला, ‘ही चर्चा खूप खासगी होती. तो संघाच्या रणनीतीचा भाग होता.’ मात्र पुजाराला अतिबचावात्मक खेळ थांबवून, प्रतिस्पर्धी संघावरचा दबाव वाढविण्यास सांगितल्याचे रोहितने कबूल केले.
‘ गोलंदाजांनी शानदार आणि एकत्रित कामगिरी केली. हा परिपूर्ण विजय ठरला. आता आम्हाला कमिन्सच्या परतण्याची प्रतीक्षा आहे. भारतात नेतृत्व करायला मला आवडते. मी आठवडाभर नेतृत्वाचा आनंद लुटला. येथे रणनीती कशी आखायची आणि ती कशी अमलात आणायची याचे कौशल्य माझ्याकडे आहे.’- स्टीव्ह स्मिथ, काळजीवाहू कर्णधार ऑस्ट्रेलिया
ही मालिका फारच उल्लेखनीय ठरली आहे. येथे येऊन संघासाठी विशेष कामगिरी करणे माझ्यासाठी लाभदायी ठरले. माझ्याकडे विशेष कौशल्य आणि योजना नसल्या तरी ‘स्टॉक बॉल’वर माझा विश्वास आहे. विराट आणि पुजारासारख्या दिग्गजांना मी आव्हान देऊ शकलो याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानतो.’नाथन लायन, सामनावीर.