नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात उपकर्णधार अजिक्य रहाणेने सर्वधिक ४९ धावांचे योगदान दिले, मात्र अर्धशतकापासून वंचित राहिला. त्याला बाद करण्यात प्रतिस्पर्धी कर्णधार केन विलियम्सन याने मोलाची भूमिका बजावली. नील वॅगनरसोबत चर्चा करून रणनीतीअंतर्गत राहाणेला जाळ्यात ओढले.
रहाणे आखूड टप्प्याचा चेंडू चांगला खेळतो. पूल आणि हूकचा फटकाही चांगला करतो, मात्र रविवारी तो का बाद झाला, याचे कारण सांगताना माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, ‘बाऊन्सर कसा खेळायचा हे ओळखता आले पाहिजे. अर्धवट मनस्थितीत चेंडूला सामोरे जाण्यात अर्थ नाही. बाऊन्सर टोलवायचा की डिफेन्स करायचा याचा निर्णय क्षणार्धात घ्यावा लागतो. नेमक्या याच गोष्टीत अजिंक्य कमी पडला.’ लक्ष्मण स्वत: आखूड टप्प्याचे चेंडू उत्कृष्टपणे खेळण्यात पटाईत होता. त्याने विलियम्सनच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना लक्ष्मण पुढे म्हणाला, ‘मी करिअरची सुरुवात केली त्यावेळी सचिनने दिलेल्या टिप्स आजही स्मरणात आहेत. अजिंक्यलादेखील ही बाब लागू होते. अजिंक्यची नजर चेंडूवर चांगलीच स्थिरावली होती. तो चांगली फटकेबाजीही करीत होता. पण बाऊन्सरपुढे काही चुका झाल्या. त्याने आधीही अशा चुका केल्या. ख्राईस्टचर्च कसोटीतही न्यूझीलंडने अजिंक्यविरुद्ध हेच तंत्र अवलंबले होते. या उणिवा दूर करण्यासाठी आमच्या खेळाडूंनी उपाय शोधायला हवा.’
‘तुम्ही नील वॅगनर आणि केन विलियम्सन यांच्यात झालेले डावपेच आहा. योजनेनुसार त्यांनी अजिंक्यला जाळ्यात अडकवले. पाचव्या चेंडूपर्यंत त्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक नव्हता. त्यानंतर त्या ठिकाणी तसेच बॅकवर्ड शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षक लावण्यात आला. यामुळे रहाणेला द्विधा मनस्थितीत पूलचा फटका मारणे भाग पडले. त्या पूलच्या फटक्यात ‘दम’ नव्हता. ही उणीव पाहून रहाणे स्वत: फार निराश असेल,’ असे मत लक्ष्मणने व्यक्त केले आहे.
‘मी स्वत: करिअर सुरू केले त्यावेळी सचिनने मला सल्ला दिला होता. यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला दोन क्षेत्रांवर पकड मिळवावी लागेल, असे सचिन म्हणाला होता. तुमचा ऑफ स्टम्प कुठे आहे याचे नेहमी भान राखा. खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर तो खेळायचा कसा हे ओळखण्यात वेळ लागणार असेल तरी त्याचा यशस्वी सामना करता यायला हवा. शिवाय बाऊन्सर सोडून देणे किंवा डिफेन्स करणे हेदेखील अवगत असायला हवे. तुम्ही पूल किंवा हूकचे फटके मारता हे प्रतिस्पर्धी संघाला माहिती असेल तर ते तुम्हाला बाऊन्सर टाकणारच. त्यानुसार क्षेत्ररक्षणाचीही रचना असेल. मग फलंदाजांनी गाफिल का राहावे. तुमचा कमकुवतपणा प्रतिस्पर्धी संघाला ध्यानात येण्याआधी त्यावर तोडगा शोधलेला बरा.’