भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. पण, बुमराह सध्या दुखापतीतून सावरण्यासाठी लंडनमध्ये आहे. आनंदाची बातमी ही की त्याला बरं होण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रीयेला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे त्याचे चाहते खुश झाले आहेत. पण, बुमराह मुंबई इंडियन्स सोडून विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB)चा हात धरणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. काय नेमकं प्रकरण?
मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनी दिवाळीच्या निमित्तानं गुरुवारी विशेष पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टिला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी जातीनं हजेरी लावली होती. यावेळी मुंबई इंडियन्सच्या सर्व सदस्यांना दिवाळी भेट देण्यात आली. पण, या कार्यक्रमात बुमराहची अनुपस्थिती चाहत्यांची चिंता वाढवणारी ठरली. त्यामुळे अशा चर्चा रंगल्या आहेत. सप्टेंबर महिन्यापासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच त्यानं माघार घेतली. त्याच्या जागी उमेश यादवला संधी मिळाली. आगामी बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेतही बुमराहचा टीम इंडियात समावेश नाही आणि या वर्षात त्याचे कमबॅक करणे जवळपास अशक्य आहे.
मुंबई इंडियन्सने 2013मध्ये 19 वर्षीय बुमराहला संघात स्थान दिले. त्यानं पहिल्याच षटकात विराट कोहलीला तंबूत पाठवले होते. त्यानंतर त्यानं 2016मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले आणि पुन्हा मागे वळुन पाहिले नाही.