मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. या मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळत नसल्याचे दुःख चाहत्यांना होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज मालिकेतूनही माघार घेतली होती. त्यानंतर मायदेशात होणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तरी तो खेळेल अशी शक्यता होती, परंतु त्यानं त्यातूनही विश्रांती मागितली. त्यामुळे पुढील मालिकेत तरी धोनीनं खेळावं अशी मागणी त्याचे चाहते करत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात तशी मागणी करणारे फलक घेऊन चाहते दाखल झाले होते. त्यातील एका चाहत्याने तर पुढील मालिका खेळण्यासाठी धोनीला हवं तर जास्त पैसे घे पण, खेळ अशी साद घातली.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर माजी कर्णधार धोनीनं विंडीज आणि आफ्रिका यांच्याविरुद्धच्या दोन मालिकांमधून माघार काय घेतली, तर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण येऊ लागले आहे. त्या कर्णधार विराट कोहलीनं कॅप्टन कूलसोबतचा एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिल्यानंतर तर या चर्चांना वेग आला. पण, धोनीची पत्नी साक्षीनं ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही दिग्गज यष्टिरक्षक धोनीनं याबबात अद्याप काही कळवले नसल्याचे सांगून या चर्चांचा फुगा फोडला.
धर्मशाला येथील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यादरम्यान चाहत्यानं धोनीला ऑफर दिली. त्यानं लिहीले की, धोनी हवं तर 500 जास्त घे, पण पुढील मालिका खेळ.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत एन श्रीनिवासन यांची मोठी भविष्यवाणी
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी भविष्यवाणी केली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास यांनी सांगितले की,''धोनी निवृत्त कधी होईल, हे मी सांगू शकत नाही. पण, तो आयपीएलच्या पुढील मोसमात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार, हे नक्की.''
Web Title: Fan give offer to MS Dhoni; request to play next series, his poster truly echoes the sentiments of all fans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.