yuvraj singh girlfriend news : टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये २००८ मधील सांगितलेला किस्सा चर्चेत आहे. ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकल वॉन यांच्यासोबत बोलत असताना युवी म्हणाला की, मी एका अभिनेत्रीला डेट करत होतो. मला तिचे नाव घ्यायचे नाही, पण ती सध्या खूप चांगली अभिनेत्री आहे. आताच्या घडीला ती खूपच अनुभवी अभिनेत्री आहे. ती एडिलेडमध्ये शूटिंग करत होती. तेव्हा मी तिला आपण काही काळ न भेटण्याचा आग्रह केला. कारण मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो आणि मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते.
तसेच ती माझ्यासोबत बसमध्ये कॅनबेराला आली. दोन कसोटी सामन्यांमध्ये मी जास्त धावा केल्या नव्हत्या. तेव्हा मी तिला विचारले की, तू इथे काय करत आहेस? यावर ती म्हणाली की, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मग मी तिला रात्री भेटलो आणि तू तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि मला माझ्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे सांगितले, असेही युवीने नमूद केले.
खरे तर युवीने संबंधित अभिनेत्रीचे नाव घेणे टाळले. पण, चाहत्यांसह नेटकऱ्यांनी ही अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्याचा तर्क लावला. याशिवाय युवराजने सांगितलेल्या घटनेचा दाखला देत नेटकऱ्यांनी सिक्सर किंगला ट्रोल केले. २००८ मध्ये दीपिका ऑस्ट्रेलियात रणबीर कपूरसोबत 'बचना ए हसीनो' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती आणि त्यावेळी तिचे आणि युवराजचे अफेअर असल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, युवराजने जुना किस्सा सांगताना आघाडीची आणि अनुभवी अभिनेत्री असे म्हटल्याने दीपिकाच्या नावाची चर्चा रंगली. पण, चाहत्यांनी युवीला लक्ष्य करत विवाहित अभिनेत्रीबद्दल असे बोलल्याने त्याला सुनावले. विशेष बाब म्हणजे युवराजने गिलख्रिस्ट आणि वॉन या दोन दिग्गज क्रिकेटपटूंसमोर याचा उल्लेख केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. या अशा व्यासपीठावर असा किस्सा सांगण्याची काय गरज होती असे अनेकांनी म्हटले. युवराजचे नाव किम शर्मा आणि दीपिका पादुकोणसह अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. २०१६ मध्ये त्याने हेजल कीचशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.