भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शनिवारी अखेरीस कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारला मदत जाहीर केली. सर्व स्तरावरून मदतीचा ओघ वाहत असताना बीसीसीआयवर टीका होत होती. सौरव गांगुली, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, इरफान व युसुफ पठाण यांनी मदतीचा हात पुढे केला. शनिवारी बीसीसीआयनेही पंतप्रधान सहाय्यता निधीत ५१ कोटी देण्याची घोषणा केली.
''अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि बीसीसीआयच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संलग्न राज्य संघटनांसह पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन फंडात 51 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत,'' असे बीसीसीआयनं त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. बीसीसीआयचनं स्वतःच्या खिशातून नक्की किती रक्कम दिली हे गुलदस्त्यात आहे. कारण बीसीसीआयच्या या मदतील संलग्न संघटनांचाही वाटा आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यात 50 लाख दिले आहेत.