इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व मार्चच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याचे ठरत आहे. त्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने कोरोना परिस्थिती लक्षात घेता IPL 2022 एकाच राज्यात घेण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन बंगळुरू येथे पार पडणार आहे. पण, या ऑक्शनआधी बीसीसीआयनं स्पर्धा नेमकी कुठे खेळवली जाईल, याची घोषणा करावी, अशी मागणी सर्व फ्रँचायाझींनी केली होती. भारतातील कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. आयपीएल २०२२ ही भारतातच होईल, अशी घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) ने केली आहे.
स्पोर्ट्स्टारसोबत बोलताना गांगुलीने या वृत्ताला दुजोरा दिला. गांगुलीच्या माहितीनुसार आयपीएलचे साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळवण्याचा विचार सुरू आहे, तर प्ले ऑफचे सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे गांगुलीने सांगितले. प्ले ऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल प्ले ऑफसोबत महिलांची आयपीएल स्पर्धाही यंदा खेळवण्यात येईल असेही गांगुलीने स्पष्ट केले.
वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी व्हाय पाटील स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील. गांगुलीच्या या घोषणेनंतर फॅन्सनी मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी यांना 'Man Of The Tournament' म्हणून जाहीर केले.