Join us  

MS धोनीची वाट पाहत होते फॅन्स, जाडेजा बॅटिंगला निघाला अन् मग मागे फिरला... पाहा मजेशीर Video

घडलेला प्रकार पाहून तिथे बसलेले CSKचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफदेखील हसू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 10:45 AM

Open in App

MS Dhoni Ravindra Jadeja Funny Video, IPL 2024 CSK vs KKR: सोमवारी चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी झाला. चेन्नईच्या गोलंदाजांपुढे कोलकाताच्या संघाला फारशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रेयस अय्यरच्या झुंजार ३४ धावांमुळे KKRने कशीबशी १३७ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. शिवम दुबेने आपल्या फॉर्मला साजेशी फटकेबाजी केली. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यावेळी मैदानात एक वेगळीच मजा मस्ती दिसून आली.

CSK सामन्याच्या जिंकण्याच्या अगदी जवळ असताना शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला. वैभव अरोराने त्याला तंबूत धाडले. चेन्नईला त्यावेळी विजयासाठी फक्त ३ धावांची गरज होती. महेंद्रसिंग धोनी ७-८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण चेपॉकच्या चाहत्यांना यंदा धोनीला खेळताना पाहायचे होते. त्यामुळे दुबेनंतर तरी धोनीने खेळायला यावे अशी साऱ्यांची अपेक्षा होती. त्यावेळी रविंद्र जाडेजा मजा-मस्तीच्या मूडमध्ये दिसला. धोनी फलंदाजीला येणार या अपेक्षेने चाहते वाट पाहत असताना जाडेजा बॅटिंग किट घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला, जणू काही तोच फलंदाजीसाठी जातोय. त्यामुळे प्रेक्षकांचा जल्लोष थोडा कमी झाला. पण नंतर थोडे पुढे जाऊन तो मागे फिरला आणि त्यानंतर मोठ्या जल्लोषात चेपॉकच्या मैदानावर धोनी मैदानात उतरला. जाडेजा ही धमाल पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आले नाही.

दरम्यान, धोनी मैदानात आल्यानंतर त्याने फटकेबाजी केली नाही. विजयासाठी तीन धावा शिल्लक असल्याने त्याने ऋतुराज गायकवाडला स्ट्राइक दिली आणि मग कर्णधार ऋतुराजने विजयी चौकार लगावला.

रवींद्र जाडेजा ठरला सामनावीर

चेपॉकच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३४, सुनील नारायणच्या २७ आणि अंगक्रिश रघुवंशीच्या २४ धावांच्या जोरावर कोलकाताला कशीबशी १३७ धावांपर्यं मजल मारता आली. रविंद्र जाडेजाने १८ धावांत ३, तुषार देशपांडेने ३३ धावांत ३ तर मुस्तफिजूर रहमानने २२ धावांत २ बळी टिपले. माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद ६७ धावांची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने १८ चेंडूत २८ आणि डॅरेल मिचेलने १९ चेंडूत २५ धावा केल्या. CSKने १७.४ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

टॅग्स :आयपीएल २०२४रवींद्र जडेजामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स