२०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेरीस १५ ऑगस्ट २०२०मध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतलाच. त्यानंतर यूएईमध्ये झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) अपयश आलं. क्रिकेटनंतर धोनी काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे आणि आता त्याचा शेतातील माल थेट दुबईला पाठवण्यात येणार आहे.
रांचीच्या भाजी बाजारामध्ये धोनीच्या शेतमालाला प्रचंड मागणी आहे. मटार आणि टोमॅटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला मोठी मागणी आहे. तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती. आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे. बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरून या ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरचं उत्पादन घेण्यात आले आहे. २० ते २५ रुपये किलोने विकला जाणाऱ्या या कॉलिफ्लॉवरची चव हे केमिकलयुक्त भाजीपेक्षा वेगळी आहे.
माहीच्या शेतातील टोमॅटोंना बाजारात 40 रु. किलो भाव असून. 80 किलो टोमॅटोंपैकी 71 किलो टोमॅटो विकले गेले आहेत. विशेष म्हणजे धोनीने आपल्या फॉर्म हाऊससाठी कडकनाथ कोंबड्यांची पिल्लंदेखील मागवली आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास 2 हजार कोंबडे आहेत शिवनंदन यांनी सांगितले, येथील दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गाई आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गाईंच्या दूधाची विक्री बाजारात केली जात आहे.