नवी दिल्ली : ‘पराभवाच्या छायेत असलेल्या संघाच्या मदतीला धावलेल्या शेतकऱ्याच्या मुलीने इंग्लंडविरुद्ध महिला कसोटीत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. ब्रिटनमध्ये भारतीय संघ पराभूत होतो की काय, अशी शंका असताना २७ वर्षांची स्नेह राणा आठव्या स्थानवावर फलंदाजीला आली. झुंजार नाबाद ८० धावांची खेळी करीत पराभवही टाळला. पदार्पणात नाबाद ८० धावा आणि चार बळी, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
डेहराडूनपासून लांब असलेल्या सिनाऊला गावची ही मुलगी. वयाच्या नवव्या वर्षांपासून क्रिकेटकडे वळली. वडील शेतकरी, पण स्नेहच्या खेळात कुठलाही खंड पडू दिला नाही. वडील भगवानसिंग यांनी तिला मुलाप्रमाणे प्रोत्साहन दिले. त्यासाठी घरापासून दूर पाठविले. स्नेह मागील पाच वर्षे भारतीय संघापासून दूर होती.
कसोटीत संधी मिळाली आणि तिने सोने केले. तिचा हा पराक्रम पाहायला वडील मात्र हयात नाहीत. दोन महिन्यापूर्वी हृदयविकाराने भगवानसिंग यांचे निधन झाले. फादर्स डेच्या एक दिवसानंतर बोलताना स्नेह वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झाली. डोळ्यात अश्रू तरळले. माझी ही कामगिरी पाहायला वडील हयात असते तर .. .असे बोलून निरुत्तर झाली.
एकाग्रता भंग करण्याचा वारंवार प्रयत्न
कसोटी पदार्पणात फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल काय भावना आहेत, असे विचारताच स्नेहने खुलासा केला. ती म्हणाली,‘मी आणि माझी सहकारी फलंदाजी करीत असताना इंग्लिश खेळाडूंनी फारच शेरेबाजी केली. एकाग्रता भंग करण्याचा वारंवार प्रयत्न केला. आम्ही मात्र शांतचित्त राहून सामना अनिर्णीत सोडविला.
चौथ्या आणि अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात यजमान संघाला दोन बळींची गरज होती. स्नेह आणि तानिया भाटिया मात्र डगमगल्या नाहीत. ‘आमच्यावर कुठलेही दडपण नव्हते. केवळ फलंदाजी करून पराभव टाळायचा, हे एकच लक्ष्य होते. इंग्लंड संघाचे दडपण आणि परिस्थिती हावी होऊ द्यायची नाही, असा निश्चय करीत मी नैसर्गिक खेळावर भर दिला,’ असे स्नेहने सांगितले.
सेहवागचे मानले आभार
माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागने स्नेहच्या फलंदाजीचे कौतुक केले. सामना वाचविणारी खेळी पाहिल्यानंतर ही महान खेळी ठरू शकते, असे सेहवागने ट्विट करीत म्हटले होते. स्नेहने त्याचे आभार मानले आहे. ‘तुमच्याकडून झालेल्या कौतुकाला फार महत्त्व आहे’. यावर वीरूनेदेखील तुझी कामगिरी अतिविशेष होती, असे सांगून परमेश्वर तुला आणखी यश आणि संधी प्रदान करो,’ असे ट्विट केले.