Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेपूर्वी बांगलादेशच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार तमिम इक्बालने आधीच दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्यामुळे शाकिब अल हसन याच्या खांद्यावर कर्णधारपदाची सोपवली गेली. त्यात त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज इबादत होसैन ( Ebadot Hossain ) याने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण, यामुळे भारतीय संघाचं टेंशन हलकं झालं आहे. इबादतने भारताविरुद्ध ३ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध त्याची कामगिरी चांगली झालेली असल्याने त्याची माघार भारतासाठी चांगले संकेत असल्याचे म्हटले जातेय.
बांगलादेशने १० दिवसांपूर्वी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. इबादत हा त्या संघाचा सदस्य होता, परंतु मागील महिन्यात अफगाणिस्ताविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याला दुखपात झाली होती. त्यातून सावरण्यासाठी त्याला आणखी सहा आठवडे लागणार असल्याने त्याने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
''इबादतला दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवडे लागतील. या दरम्यान अनेक MRI केले गेले आणि त्याची दुखापत अजूनही बरी झालेली नाही व त्याला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळेच तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही,''असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख फिजिओ डॉ. देबाशिस चौधरी यांनी सांगितले. त्याच्या जागी बांगलादेशच्या संघात २० वर्षीय गोलंदाज तंझीम हसन साकिबचा समावेश करण्यात आला आहे. साकिब १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत ( २०२०) बांगलादेश संघाचा सदस्य होता आणि ३ सामन्यांत त्याने ९ विकेट्स घेतल्या होत्या.
बांगलादेशचा सुधारित संघ - शाकिब अल हसन ( कर्णधार), लिटन दास, नजमुल होसैन शांतो, तोवहिद हृदय, मुश्फिकर रहिम, अफिफ होसैन ध्रुबो, मेहिदी हसन मिराज, तस्कीन अहमद, हसन महमुद, मुस्ताफिजुर रहमान, सौरिफुल इस्लाम, नसूम अहमद, शाक महेदी हसन, नईम शेख, शमिम होसैन, तंझीम हसन तमिम, तंझीम हसन साकिब ( Revised Bangladesh squad for Asia Cup: Shakib Al Hasan (c), Litton Kumer Das, Najmul Hossain Shanto, Towhid Hridoy, Mushfiqur Rahim, Afif Hossain Dhrubo, Mehidy Hasan Miraz, Taskin Ahmed, Hasan Mahmud, Mustafizur Rahman, Shoriful Islam, Nasum Ahmed, Shak Mahedi Hasan, Naim Sheikh, Shamim Hossain, Tanzid Hasan Tamim, Tanzim Hasan Sakib)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल