सिडनी : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रलिया दौऱ्यावर आहे. २७ नोव्हेंबरपासून उभय संघांदरम्यान वन डे मालिकेला सुरुवात होणार असून, त्याआधी सर्व जण विलगीकरणादरम्यान सरावात देखील व्यस्त आहेत. भारतीय खेळाडूंनी रविवारी तसेच सोमवारी वन डे मालिकेची पूर्वतयारी म्हणून पांढऱ्या चेंडूने सराव केला. काही खेळाडूंनी मात्र लाल चेंडूने गोलंदाजीत हात आजमावला. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करीत भारतीय संघात स्थान मिळविणारा तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन यानेदेखील नेट्समध्ये प्रभावी मारा करीत मुख्य कोच रवी शास्त्री यांचे लक्ष वेधले.
नेट्समधील गोलंदाजी सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. फोटोचे कॅप्शन देताना बीसीसीआयने लिहिले, ‘आम्ही टी. नटराजनला आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना आणि यशस्वी होताना पाहिले. त्याने राष्ट्रीय संघात प्रथमच स्थान मिळविल्यानंतर येथे नेट्समध्ये सराव केला. हा क्षण स्वप्न साकार झाल्याचा आनंद देणारा आहे.’
२९ वर्षांच्या नटराजनने सनरायजर्स हैदराबादकडून या मोसमात वारंवार आपल्या यॉर्करच्या बळावर अनेक दिग्गज गोलंदाजांना माघारी धाडले होते. याच कारणांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. तो भारताच्या टी-२० संघाचा सदस्य आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीऐवजी त्याला संघात घेण्यात आले. वरुणला आयपीएल खेळताना खांद्याला दुखापत झाली होती.
नटराजनचा आयपीएल २०२० चा प्रवासदेखील मजेशीर राहिला आहे. त्याने हैदराबादकडून १६ सामन्यात १६ गडी बाद केले. याच कालावधीत प्ले-ऑफमध्ये स्थान पटकविण्यात तसेच दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मोलाची भूमिका वठवली होती.
Web Title: Fast bowler Natarajan proved his bowling skills
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.