कोलकाता : क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आयपीएलच्या लिलाव सोहळ्यात सर्वांना धक्का दिला तो आॅस्टेÑलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने. सर्वाधिक १५.५० कोटींची विक्रमी बोली मिळवत कमिन्स आयपीएलमधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वासाठी गुरुवारी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने कमिन्सला १५.५० कोटीची बोली लावून स्वत:कडे खेचून नेले.कमिन्सला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सुरुवातीपासून चढाओढ रंगली. या दोन्ही संघांनी एकामागोमाग एक बोली लावत कमिन्सची किंमत २ करोडवरुन १५ करोडवर आणून ठेवली. मात्र केकेआरने अखेरच्या क्षणी एकदाच १५.५० कोटींची बोली लावून कमिन्सला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले. कमिन्सने २५ आयपीएल सामन्यात ३२ बळी घेतले आहेत. यावेळी आयपीएल लिलावामधील नवा विक्रमवीर ठरलेल्या कमिन्सने सर्वांत महागड्या विदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकले. २०१७ मध्ये रायझिंग पुणे संघाने स्टोक्सला १४.५ कोटीत खरेदी केले होते. त्याचवेळी, आॅस्टेÑलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाबने १०.७५ कोटीची बोली लावून पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले. आॅस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अॅरोन फिंचला रॉयल चॅलेंजर्सने ४.४ कोटीत, तर ख्रिस लिनला मुंबई इंडियन्सने २ कोटीत खरेदी केले. लिलावाची सुरुवात लिनपासून झाली व मुंबईने त्याला घेत लिलावाचा श्रीगणेशा केला.या लिलावात आणखी एक लक्षवेधी खेळाडू ठरला तो मुळचा मुंबईकर व आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळलेला अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबे. वयाच्या ४७व्या वर्षी लिलाव प्रक्रियेत कमाई करणारा प्रवीण सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. कोलकाताने २० लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.एकीकडे अनेक युवा खेळाडूंवर कोणीही बोली लावत नसताना कोलकाताने प्रवीणला आपल्या संघात घेतले. ‘कोलकाताने मला निवडले याचा आनंद आहे. या संघासाठी मी माझा पूर्ण अनुभव पणास लावेन. मी अंतिम संघात स्थान नाही मिळवले, तरीही माझ्या अनुभवाचा संघास फायदा होईल,’ असे प्रवीण म्हणाला.लिलावात मोठी रक्कम मिळविणाऱ्यात द.आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस याचा समावेश आहे. त्याला आरसीबीने १० कोटींची रक्कम मोजून खरेदी केले. याआधी इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयोन मोर्गनवर कोलकाताने ५.२५ कोटी, तर यष्टिरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पावर राजस्थान रॉयल्सने ३ कोटीची बोली लावली. त्याचवेळी, लिलावात कसोटीपटू चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांच्यावर कुणीही बोली लावली नाही. तसेच १४ वर्षीय अफगाणिस्तानच्या नूर अहमद याच्यावरही बोली लागली नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने केली विक्रमी १५.५० कोटींची कमाई
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने केली विक्रमी १५.५० कोटींची कमाई
आयपीएल लिलाव: ग्लेन मॅक्सवेलने मिळवले १०.७५ कोटी, कांगारुंनी राखले वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 4:43 AM