अहमदाबाद : मोटेरामध्ये पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीची आशा बाळगण्यात येत आहे; पण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मते, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत वेगवान गोलंदाजांची भूमिकाही फिरकीपटूंप्रमाणेच महत्त्वाची असेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहे आणि बुधवारपासून येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी नव्याने तयार करण्यात आलेल्या स्टेडियमची नवी खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
तिसऱ्या कसोटीत चेंडू स्विंग होण्याची शक्यता नाही का, याबाबत बोलताना कोहली म्हणाला, जोपर्यंत चेंडू टणक व चकाकणारा आहे, तोपर्यंत वेगवान गोलंदाजांकडे सामन्यात संधी राहील. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते हे योग्य आकलन आहे, (चेंडू स्विंग होणार नाही) असे वाटत नाही. गुलाबी चेंडू लाल चेंडूंच्या तुलनेत अधिक स्विंग होतो. २०१९ मध्ये (बांगलादेशविरुद्ध) आम्ही प्रथमच या चेंडूने खेळलो होतो. त्यावेळी चेंडू अधिक स्विंग होत असल्याचा अनुभव आला होता.’ खेळपट्टी जर वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल तर इंग्लंडचे पारडे वरचढ ठरण्याचा दावा कोहलीने फेटाळला.
भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, ‘आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे, याची तुम्हाला कल्पना असेल. त्यामुळे चेंडू स्विंग झाला तरी त्याची आम्हाला चिंता नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत.’ उभय संघ या लढतीत अनिश्चितांसह सहभागी होतील.
गुलाबी चेंडू वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरण्यासाठी ओळखला जातो; पण या लढतीत फिरकीपटूंना किती मदत मिळते, याबाबत उत्सुकता आहे. मायदेशात खेळताना फिरकी गोलंदाजी भारताची मजबूत बाजू आहे. सीनियर भारतीय फलंदाज रोहित शर्माने यापूर्वीच सांगितले आहे की, खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहील. कोहली म्हणाला, खेळपट्टी कशीही असली तरी गुलाबी चेंडूला सामोरे जाणे लाल चेंडूच्या तुलनेत आव्हानात्मक राहील.
कोहलीने सांगितले की, ‘खेळपट्टी कुठलीही असली तरी गुलाबी चेंडूने खेळण्याचे आव्हान असते. विशेषत: सूर्यास्ताच्या वेळी. होय, निश्चितच फिरकीपटूंचा भूमिका राहील, पण वेगवान गोलंदाजांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जोपर्यंत चेंडूची चमक कायम आहे आणि चेंडू टणक आहे तोपर्यंत गुलाबी चेंडूमुळे सामन्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्याप्रमाणेच तयारी करीत आहोत.’
‘इंग्लंड संघाची मजबूत व कमकुवत बाजू काय आहे, याची आम्हाला अडचण नाही. आम्ही त्यांना त्यांच्या देशातही पराभूत केले आहे. तेथे चेंडू अधिक स्विंग होतो; त्यामुळे आम्हाला कुठली अडचण नाही. प्रतिस्पर्धी संघात अनेक कमकुवत बाजू आहे. त्याचा लाभ घ्यायला हवा. जर त्यांच्यासाठी वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टी असेल तर आमच्यासाठी तीच खेळपट्टी राहील.’ - विराट कोहली