- गौतम गंभीर लिहिताे...
मोहम्मद शमी जेव्हा कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळत होता तेव्हा त्याच्या डोक्यावर अधिक केस होते. शमी हा मुळात खूप शांत स्वभावाचा माणूस आहे. अमरोहा निवासी शमीला आंबे खूप आवडत होते. आता त्याला आंब्याचा कोटा पूर्ण मिळतोय की नाही माहिती नाही, पण गोलंदाजीचा पूर्ण कोटा त्याला नक्कीच मिळत आहे. श्रीलंकेविरुद्ध शमीच्या घातक स्पेलबाबत चर्चा करण्याआधी बेन स्टोक्सविरुद्ध त्याच्या आक्रमक शैलीची चर्चा करणे आवश्यक आहे. गेल्या रविवारी लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शमीच्या घातक गोलंदाजीसमोर स्टोक्स एका नवशिक्या फलंदाजाप्रमाणे खेळताना दिसला, जो एखाद्या गावातील क्लबमध्ये सरावासाठी आला आहे. जेव्हा शमीने वानखेडेमध्ये श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी केली तेव्हा असे वाटले की तो आताही लखनौमध्येच आहे. रविवारच्या सायंकाळी तो त्याच ईडन गार्डनच्या ड्रेसिंग रूममध्ये परतेल, जे त्याचे होम ग्राउंड आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामनाही अतिशय रोमांचक होईल. मला वाटते की, हे दोन्ही संघ अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताला आव्हान देऊ शकतो. केवळ काही उणिवा त्यांना त्रास देऊ शकतात. त्यात नेदरलँड्सविरुद्धचा त्यांचा पराभव आणि पाकिस्तानविरुद्धचा संघर्षपूर्ण विजय यांचा समावेश आहे. दुसरीकडे भारताला या स्पर्धेत विजयासाठी फारसा घाम गाळावा लागलेला नाही. ईडन गार्डन्सवरील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे वेगवान गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात.
दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनने मला खूपच प्रभावित केले आहे. तो शानदार गोलंदाज, अष्टपैलू खेळाडूव्यतिरिक्त चांगला क्षेत्ररक्षकही आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याशी त्याचा सामना रोमांचक ठरू शकतो. क्विंटन डीकाॅकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी खूप प्रभावित केले आहे. लखनौ सुपर जायंट्स संघातील माझा सहकारी डीकाॅक कलात्मक आणि आकर्षक फटके मारण्यात तरबेज आहे. सध्याची त्याची कामगिरी पाहता त्याने दक्षिण आफ्रिकेला विश्वविजेता बनविण्याचा विडाच उचलला आहे, असे वाटते. हेन्री क्लासेनच्या फलंदाजीत खूप सुधारणा झाली आहे. फिरकीविरुद्ध त्याची फलंदाजी पाहणे अतिशय आनंददायी आहे. एडन मार्करमही संयमी, आक्रमक अशा दोन्ही प्रकारे फलंदाजी करून धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. राॅसी वान डर दुसेन याचाही फाॅर्म शानदार आहे. केशव महाराज प्रभावी गोलंदाजी करत आहे. फलंदाजीतही त्याने चमक दाखविली आहे. एकूणच गुणतालिकेतील आघाडीच्या संघांतील या संस्मरणीय लढतीचा कोलकाता साक्षीदार असेल.
(गेमप्लॅन/दिनेश चोप्रा मीडिया)