नवी दिल्ली- अभिनव बिंद्राच्या वडिलांनी मुलाला शूटिंग सरावासाठी शूटिंग रेंज तयार करून दिलं होतं आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून बिंद्रानंही वडिलांचा अभिमान वाढवला होता. अशीच काहीशी गोष्ट प्रिया पुनिया हिची आहे. तिच्या वडिलांनीही मुलीला सराव करण्यासाठी क्रिकेटचं मैदान बनवलं, तर मुलीनं भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये जागा मिळवली आणि वडिलांची छाती गर्वानं फुगून गेली. 22 वर्षीय पुनियाला न्यूझीलंड दौऱ्यात टी-20च्या संघात जागा मिळाली. प्रियाही ही सलामीवीर फलंदाज आहे. ती म्हणते, मी वडिलांसाठी असं काम केलं आहे की त्यांनाही त्याचा नक्कीच गर्व वाटेल.प्रियाचे वडील सुरेंद्र यांनी मालमत्ता विकून 2010 साली जयपूर शहराच्या बाहेर हरमाडा येथे 22 लाख रुपयांमध्ये 1.5 एकर जमीन खरेदी केली. वडील सांगतात, माझी तिथे नेहमीच स्पोर्ट्स कॉम्पलेक्स तयार करण्याची इच्छा होती. परंतु माझ्या मुलीला बॅडमिंटनमध्ये रस नव्हता. तिला क्रिकेट खेळणं आवडायचं. ती मुलांबरोबर क्रिकेट खेळत होती. तेव्हाच मी या मैदानात क्रिकेट पिच तयार करून नेट्स लावण्याचं ठरवलं. प्रिया ही दिल्लीच्या टीमकडून खेळते. प्रियाला 2015मध्ये टीम इंडियामध्ये निवड होईल, अशी आशा वाटत होती. कारण ती घरच्या मैदानावर जबरदस्त खेळत होती. तसेच प्रियानं न्यूझीलंड A विरुद्ध भारत A या सामन्यात फलंदाजी करताना 42 चेंडूंमध्ये 59 धावा काढल्या होत्या. घरच्या मैदानावर प्रियाची ही धावसंख्या इतर खेळाडूंच्या तुलनेत जास्त होती. प्रियाला तेव्हाच वाटलं होतं की आपली राष्ट्रीय टीममध्ये निवड होईल. परंतु तसं काही झालं नाही. प्रियाही नाराज न होता प्रयत्न करत राहिली, अखेर तिची तपश्चर्या फळाला आली अन् महिला टीम इंडियामध्ये तिची निवड झाली.मुलीचं महिला टीम इंडियामध्ये निवड झाल्यानं प्रियाच्या वडिलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. मुलीच्या माध्यमातून भारतासाठी खेळण्याचं त्यांचं स्वप्न एका अर्थी पूर्ण होत आहे. गेल्या दोन सत्रांमध्ये प्रिया सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू ठरली आहे. प्रियानंही टीम इंडियामध्ये झालेल्या निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे. मला आशा होतीच की वनडे टीममध्ये माझी निवड होईल. परंतु मला जी संधी मिळाली आहे, त्यात मी स्वतःला सिद्ध करून दाखवेन, असंही प्रिया म्हणाली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वडिलांनी क्रिकेटसाठी तयार केलं मैदान, मुलीनं टीम इंडियात जागा मिळवून वाढवली शान
वडिलांनी क्रिकेटसाठी तयार केलं मैदान, मुलीनं टीम इंडियात जागा मिळवून वाढवली शान
तिच्या वडिलांनी मुलीला सराव करण्यासाठी क्रिकेटचं मैदान बनवलं, तर मुलीनं भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये जागा मिळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 10:43 PM