नई दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर तसे अनेक आश्चर्यचकित करणारे कारनामे घडत असतात. परंतु काल आंतरराष्ट्रीय सामन्यात अनोखी घटना घडल्यानं क्रिडाविश्वात चर्चेला उधान आलं आहे. ही अनोखी घटना क्रिकेटच्या इतिहासात पहिलीच असू शकते. दोन भावांची जोडी आपण क्रिकेटमध्ये आपण खूप वेळा पाहिली असेल. पण बाप-लेकांची जोडी एकत्र पाहण्याचा योग खूप कमी वेळा पहायला मिळतो. वेस्टइंडिजचा 43 वर्षीय महान खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा 21 वर्षीय मुलगा तेजनारायण चंद्रपॉल ही जोडी मागील काही दिवसांपासून गयाना जॅगवार्सकडून खेळत आहे. या सामन्यात शिवनारायण चंद्रपॉलने मारलेल्या एका फटक्यावर धाव घेताना तेजनारायण चंद्रपॉलला बाद झाल्यानं नव्या चर्चेला उधान आलं आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.
वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या सीड्ब्लूआय सुपर 50 स्पर्धेत झालेल्या सामन्यात विंडवार्ड वोल्कनोस संघाने गयाना जॅगवार्सचा पराभव केला. काल झालेल्या उपांत्य सामन्यात गयाना संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विंडवार्ड वोल्कनोस संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत सात बाद 286 धावा केल्या. 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गयाना संघाला सुरुवातीलाच धक्का बसला. त्यातून संघ सावरला नाही. गयाना संघाला 44.2 षटकांमध्ये 231 धावांपर्यंतच मजल मारता आली. गयाना जॅगवार्स संघाकडून तेजनारायण चंद्रपॉल आणि चंद्रपॉल हेमराज हे फलंदाज सलामीला आले. पहिल्या षटाकांमध्ये पहिल्याच षटकात चंद्रपॉल हेमराज बाद झाल्यावर मैदानात शिवनारायण चंद्रपॉल आणि तेजनारायण चंद्रपॉल ही बाप-लेकांची जोडी खेळत होती.
चांगला जम बसलेल्या शिवनारायण चंद्रपॉलने जेव्हा पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइवचा फटका मारला तेव्हा तो रायन जॉन या गोलंदाजाच्या हाताला लागून थेट यष्टींना लागला. यावेळी धाव घेण्यासाठी पुढे आलेला तेजनारायण चंद्रपॉल मात्र धावबाद झाला. त्यामुळे संघाची अवस्था दोन बाद 20 अशी झाली आणि अखेर संघाला 50 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे क्रिकेटमध्ये बापानं मारलेल्या एका फटक्यावर मुलगा धावबाद होण्याचा दुर्मीळ योगायोग पहायला मिळाला. तेजनारायण चंद्रपॉलने 12 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले.
दरम्यान, तीन वर्षापूर्वी 2015मध्ये शिवनारायण चंद्रपॉल आणि तेजनारायण चंद्रपॉल या जोडीनं 40 षटकांच्या सामन्यात 256 धावांची भागीदारी केली होती.