Join us  

फिरकीपटूंविरुद्ध अपयश आॅस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब

भारताने वर्षाच्या सुरुवातीला कसोटी मालिका जिंकल्यानंतर काही अपवाद वगळता आॅस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतही वर्चस्व गाजवले. टी-२० क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी करीत भारताने शानदार कामगिरीचे चक्र पूर्ण केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 3:41 AM

Open in App

- सौरव गांगुली लिहितात...भारताने वर्षाच्या सुरुवातीला कसोटी मालिका जिंकल्यानंतर काही अपवाद वगळता आॅस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतही वर्चस्व गाजवले. टी-२० क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी करीत भारताने शानदार कामगिरीचे चक्र पूर्ण केले. माझ्या मते हार्दिक पांड्या ही या मालिकेची सर्वोत्तम मिळकत आहे. तो त्याच्या खेळामध्ये प्रगती करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तो देशासाठी आणखी एक सामना जिंकून देणारा खेळाडू म्हणून पुढे येत आहे. त्याच्यात नैसर्गिक गुणवत्ता असून गोलंदाजी व फलंदाजीमध्ये संयमही आहे. त्याने याचा योग्य उपयोग करायला हवा. केदार जाधव व मनीष पांडे यांनाही योग्यपणे हाताळणे आवश्यक आहे. त्यांच्याबद्दल चर्वितचर्वण सुरू असल्याची मला कल्पना आहे, पण विराटने त्यांना संधी देण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.युवा खेळाडूंना संधी देताना तुम्हाला संयम बाळगावा लागतो. त्यानंतरच त्याचा लाभ मिळतो. अजिंक्य रहाणेने मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग केला आहे, पण काही शतके झळकावण्याची संधी गमावल्याचे त्याला नक्की शल्य असेल. रहाणेला टी-२० क्रिकेटमध्ये सलामीला संधी मिळणे गरजेचे आहे.कुलदीप यादव चहल यांनी भारताच्या विजयात कशी महत्त्वाची भूमिका बजावली, याबाबत चर्चा सुरू असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अश्विन व जडेजा यांच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कुलदीप व चहल यांनी चांगला मारा केला, पण भारतीय वातावरणात फिरकीपटू चांगली कामगिरी करतात असा अनुभव आहे. भारताबाहेर त्यांनी अद्याप छाप सोडलेली नसल्यामुळे त्यांच्याबाबत भाष्य करणे घाईचे ठरेल. अश्विन व जडेजा या अनुभवी खेळाडूंना विसरता येणार नाही. भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शमी व उमेश यांना संधी देण्याचा मार्ग शोधायला हवा. बुमराह व भुवी चांगली गोलंदाजी करीत आहेत, पण शमी व उमेश यांना मॅच फिट ठेवणे आवश्यक आहे. कारण बुमराह किंवा भुवी दुखापतग्रस्त झाले तर त्यांचा पर्याय म्हणून येणारा खेळाडू योग्य फॉर्मात असणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच-सहा वेगवान गोलंदाज सज्ज असणे गरजेचे आहे. त्यांना नियमित ब्रेकनंतर संधी दिली तर ते शक्य आहे.आॅस्ट्रेलियन संघाने काही प्रगती केल्याचे निदर्शनास आलेले नाही. सुरुवातीला भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान विशेष मालिका होत नव्हत्या, पण अलीकडच्या कालावधीत आॅस्ट्रेलिया संघ वारंवार भारताचा दौरा करीत आहे. भारतीय संघाने मात्र आपल्या प्रत्येक विदेश दौºयात प्रगती केली असल्याचे दिसून येते. आॅस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, पण तरी भारतीय फिरकीपटूंविरुद्ध खेळताना चाडपडत असल्याचे चित्र बघितल्यामुळे आश्चर्य वाटते. आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा चिंतेचा विषय आहे. चांगले खेळाडू यावर लवकरच तोडगा शोधतात. स्टीव्ह वॉ, हेडन, लँगर आणि गिलख्रिस्ट यांनी यावर तोडगा शोधला होता. वेगवान गोलंदाजांना खेळणे जशी कला आहे त्याचप्रमाणे फिरकीपटूंना खेळणेही कलाच आहे. त्यासाठी दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू असणे आवश्यक आहे.(गेमप्लॅन)

टॅग्स :क्रिकेट