घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक!

या संपूर्ण मालिकेत ज्या पद्धतीचे क्रिकेट खेळले गेले ते निश्चितच चाहत्यांना अपेक्षित नव्हते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 08:59 AM2023-03-14T08:59:46+5:302023-03-14T09:00:50+5:30

whatsapp join usJoin us
fearful attitude kills test cricket | घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक!

घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह

अखेर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठण्यात कसाबसा यशस्वी ठरला. त्यामुळे भारतीय चाहत्यांना सुटकेचा नि:श्वास सोडता आला. मात्र या संपूर्ण मालिकेत ज्या पद्धतीचे क्रिकेट खेळले गेले ते निश्चितच चाहत्यांना अपेक्षित नव्हते. 

एक गोष्ट स्पष्ट होती की, मालिका ३-१ ने जिंकून डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या घाईमुळे भारतीयांनी फिरकीला अधिकच अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्याचा आग्रह धरला. या डावपेचांमुळे खऱ्या अर्थाने नुकसान झाले ते चाहत्यांचे. कारण ऑस्ट्रेेलियासारखा प्रतिस्पर्धी समोर असल्याने सामने पूर्ण पाच दिवसांचे होतील अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण ती खेळपट्टीने फोल ठरवली. भारतीय संघ पहिले दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. पण तिसऱ्या कसोटीत हेच डावपेच भारतीयांच्या अंगलट आले. लायन, मर्फी आणि कुहेन्मन या ऑस्ट्रेलियन त्रिकुटाने भारतीय फलंदाजीचे लक्तरे वेशीवर टांगली. तुम्हाला लक्षात असेल, नागपूर आणि इंदूरच्या कसोटीवेळी शेवटच्या क्षणी खेळपट्टी बदलल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. पण इंदूरच्या पराभवामुळे बीसीसीआयचे अधिकारी चांगलेच संतापले आणि अहमदाबाद कसोटीत पूर्ण पाटा खेळपट्टी ठेवण्याचे ठरले. पण याचा परिणाम झाला असा की पाच दिवसांच्या खेळात केवळ वीसच फलंदाजांना बाद करण्यात गोलंदाजांना यश आले. उमेश यादव धावबाद झाला होता. फलंदाजांनी धावा (१२२६) मात्र खोऱ्याने काढल्या. पण अशा प्रकारच्या कसोटी सामन्यांमुळे क्रिकेटचे कधीही भले होणार नाही. कारण एकतर आपल्याला फिरकीला खूप जास्त अनुकूल खेळपट्ट्या बनवायच्या असतात, नाहीतर एकदम सपाट. यामुळे कसोटी क्रिकेटने नुकसान करण्याचे पातक आपल्याही माथी लागणार आहे. कारण झटपट क्रिकेटमुळे पाच दिवसांचा खेल बघण्याचा प्रेक्षकांचा संयम आधीच कमी झालेला आहे. तरीसुद्धा क्रिकेटप्रेमापोटी ते सामना बघतात. पण जर त्यांच्या ताटात आपण अशाप्रकारचे अळणी क्रिकेट वाढणार असू तर त्यांच्याही संयमाचा बांध फुटायला वेळ लागणार नाही.

दुसरीकडे, न्यूझीलंड आणि इंग्लंडकडे बघा. ते अप्रतिम कसोटी क्रिकेटचा नजराणा पेश करत आहेत. ज्याप्रकारे न्यूझीलंडने शेवटचे दोन कसोटी जिंकले ते अप्रतिम होते. कसोटीच्या लोकप्रियतेत असेच सामने भर घालत असतात. सोमवारी शेवटच्या दिवशी ५३ षटकांत २५७ धावा करत न्यूझीलंड लंकेविरुद्धचा रोमांचक सामना जिंकला. इंग्लंड तर निर्णयांचा विचार न करता बेझबॉल क्रिकेट पद्धतीचा अवलंब करताना दिसते आहे. नागपूर, दिल्ली आणि इंदूरची खेळपट्टी बघून हरभजनसिंग म्हणाला होता की, भारतीय संघ व्यवस्थापनाला आपल्या गोलंदाजांवर विश्वास नसेल. त्यामुळेच अशा खेळपट्ट्यांचा त्यांनी आग्रह धरला. कारण अशा खेळपट्ट्यांवर केवळ स्टम्पवर गोलंदाजी करायची असते. फलंदाज आपोआप बाद होतात. जर तुम्ही हे डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने विल्यमसन आणि न्यूझीलंडने वाचविले. कारण त्यांच्या विजयाने भारतासाठी फायनलचे दार उघडले गेले. 

राहत इंदौरी यांचा शेर बीसीसीआयच्या सध्याच्या मानसिकतेसाठी तंतोतंत लागू पडतो, लोग हर मोड़ पर रुक रुक के संभलते क्यों है, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों है..

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: fearful attitude kills test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.