नवी दिल्ली : २०१८ साली आशिया चषकात खेळत असताना हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले होते. ‘त्या क्षणी मला खरंच असे वाटले की माझे करिअर आता संपले.मी याआधी कधीच कुणाला असे स्ट्रेचरवरून घेऊन जाताना पाहिले नव्हते. मी दहा मिनिटे नुसता पडून होतो, काहीच समजत नव्हते. शुद्धीवर येताच वेदना सहन होत नव्हत्या. तथापि त्यानंतर शरीराने मला साथ दिली आणि मी हळूहळू सावरलो,’ असे हार्दिकने ‘क्रिकबज’शी बोलताना बुधवारी सांगितले.कंबरेच्या दुखण्यातून सावरलेला अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा सध्यातरी कसोटी क्रिकेट खेळण्याची जोखीम पत्करू इच्छित नाही. झटपट क्रिकेटमधील स्वत:च्या उपयुक्ततेची त्याला जाणीव असून शस्त्रक्रियेनंतर तो नव्याने उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे.आतापर्यंत ११ कसोटी सामने खेळलेला पांड्या सप्टेंबर २०१८ पासून कसोटी खेळलेला नाही. पण मर्यादित षटकांच्या सामन्यात तो आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्यातिप्राप्त झाला.मागच्या वर्षी कंबरेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून हार्दिक पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्याने स्वत:ला बॅकअप वेगवान गोलंदाज मानत असल्याचे सांगितले. कंबरेच्या दुखण्यामुळे सध्या कसोटी खेळणे आव्हानात्मक असेल. मी केवळ कसोटीपटू असतो तर खेळलो असतो मात्र तसे नाही. झटपट सामन्यात आपली अधिक उपयुक्तता असल्याची जाणीव आहे, असे हार्दिकम्हणाला. (वृत्तसंस्था)त्या घटनेनंतर समजदार बनलोमागच्या वर्षी एका रिअॅलिटी शोमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे पांड्या वादात अडकला होता. बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई केली. हार्दिकने या घटनेबाबत माफ ी मागितल्यानंतर वाद शमला होता. याविषयी तो म्हणाला, ‘त्या घटनेनंतर मी समजदार बनलो. आयुष्यात काही चुका केल्या, पण माफीही मागितली. ती घटना घडली नसती तर आणखी एका टीव्ही शोमध्ये दिसलो असतो. माझ्या चुकीची शिक्षा कुटुंबीयांना भोगावी लागली, याचा खेद वाटतो.’रिकी पाँटिंगने मुलासारखे सांभाळले‘करिअरमध्ये एक वेळ अशी होती की दुसऱ्याच्या गोष्टीचा स्वत:वर प्रभाव पडायचा. त्यामुळे विचलित व्हायचो. त्यावेळी मुंबई इंडियन्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी मला मुलासारखे जपले. मी त्यांच्यापासून बरेच काही शिकलो,’ असे हार्दिक म्हणाला.विराट, शास्त्री, द्रविड यांचा आभारीपांड्याने कर्णधार विराट कोहली, कोच रवी शास्त्री आणि एनसीए संचालक राहुल द्रविड यांचे आभार मानले. या तिघांनी मला मोकळीक दिली. सुरक्षेची हमी दिली, त्यामुळे साहसी निर्णय घेऊ शकलो. मी जसा आहे तसे या तिघांनी स्वीकारले. क्रिकेटपटू या नात्याने मला जो सन्मान दिला, याचा गर्व वाटतो, असेही त्याने सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- त्याक्षणी वाटले, आता करिअर संपले; हार्दिक पांड्याने सांगितला कठीण काळ
त्याक्षणी वाटले, आता करिअर संपले; हार्दिक पांड्याने सांगितला कठीण काळ
कसोटी खेळण्याची घाई नाही, मर्यादित षटकांच्या सामन्यात स्वत:ची उपयुक्तता जाणतो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 4:46 AM