नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पॅरीने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडच्या विरुद्ध 47 धावा करत एलिस आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 1000 धावा व 100 विकेट्स घेणारी पहिली (महिला, पुरुष) खेळाडू ठरली आहे.
28 वर्षीय एलिसने आतापर्यंत 104 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहे. यामध्ये तिने 1005 धावांसह 103 विकेट्स घेतल्या आहेत. तिने नोव्हेंबरमधील वर्ल्ड टी 20 च्या अंतिम सामन्यातच 100 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर रविवारी झालेल्या इंग्लंडच्या टी 20 सामन्यात तिने 1000 धावांचा टप्पा ओलांडून विक्रमाची नोंद केली. पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने 1414 धावांसह 98 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने 1471 धावा करत 88 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
पुरुष आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वात जास्त धावा भारताचा फलंदाज रोहित शर्माने केल्या आहेत. त्याने 94 सामन्यात 2331 धावा तर, न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने 2272 आणि विराट कोहलीने 2263 धावा केल्या आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये शाहिद आफ्रिदी 99 सामन्यांत 98 विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा 97 विकेट्स घेत दुसऱ्या स्थानावर आहे.