मुंबई : कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने केलेल्या विधानानंतर उठलेले वादळ क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. महिलांचा अनादर करणारे वक्तव्य पांड्याने या कार्यक्रमात केले होते. अनेकांच्या रोषाचाही सामना करावा लागल्यानंतर पांड्याने बुधवारी जाहीर माफी मागितली. या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसीलाही पांड्याने उत्तर देत माफी मागितली. मात्र, माफी पुरेशी नाही, तर त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी महिला क्रिकेटपटूनं केली आहे.
बीसीसीआयनं पाठवलेल्या नोटिसीला पांड्याने उत्तर दिलं असलं तरी, लोकेश राहुलकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. पांड्यासारखं धक्कादायक विधान राहुलनं केलं नव्हतं, परंतु तरीही त्याला बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
''क्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नातं काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत क्रिकेटपटूंनी यात योग्य तो समन्वय राखला होता आणि आपण देशाचं प्रतिनिधित्व करतो, याची जाण त्यांना होती. अशा प्रकारचं विधान हे स्वाकारण्यासारखे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही 70च्या दशकात असे विधान केलं होतं आणि त्यासाठी त्यांना एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती,'' असे एडुल्जी यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
पांड्याने बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला,''कॉफी विथ करण या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यावर कोणाची मनं दुखावली असतील, तर त्यांची माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते.'' बीसीसीआयच्या नोटिसीला उत्तर देत तो म्हणाला की,'' हा कार्यक्रम दिलखुलास गप्पांचा होता आणि त्या ओघात मी विधान करून गेलो. त्या विधानाचं गांभीर्य मला नंतर समजलं. माझी चूकं मला उमगली आणि मी बीसीसीआयची मनापासून माफी मागतो. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचीही मी माफी मागतो.''
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना 12 जानेवारीला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल आणि तेथे संघ पाच वन डे व तीन ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे.