नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला स्टेडियम आता भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी हा निर्णय घेतला. जेटली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) उपाध्यक्ष आणि दिल्ली असोसिएशनचे अध्यक्ष होते. 12 सप्टेंबरला एका सोहळ्यात कोटला स्टेडियमच्या नामांतर करण्यात येणार आहे. याशिवाय यापूर्वी स्टेडियममधील एका स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे.
दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले की,''अरुण जेटली यांच्या पाठींब्या आणि प्रोत्साहनामुळे विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसारखे खेळाडू घडले.''
अरुण जेटलींनीच केली होती सेहवागची मनधरणी; त्यामुळेच तो क्रिकेट खेळायला झाला तयार
वीरेंद्र सेहवाग हा दिल्लीकडून क्रिकेट खेळत होता. पण अंतर्गत राजकारणाचा त्याला फटका बसत होता. त्यामुळे त्याने दिल्लीच्या संघाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता.
जेटलींना जेव्हा समजले की सेहवाग दिल्लीचा संघ सोडून हरयाणाला खेळायला जाणार आहे आणि त्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यावेळी जेटली यांनी स्वतहून सेहवागशी संपर्क साधला. त्याच्याबरोबर त्यांनी बराच वेळ बातचीत केली आणि अखेर सेहवागची मनधरणी करण्यात जेटली यशस्वी झाले होते. जेटली यांच्यामुळेच सेहवागने दिल्ली सोडून हरयाणामधून खेळण्याचा निर्णय बदलला होता.