भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर कसोटी क्रिकेटच्या प्रचारासाठी पाच केंद्रांचा सल्ला सुचवला होता. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्भेळ यश मिळवलं. टीम इंडियानं तीनही कसोटी जिंकून इतिहास घडवला. त्यानंतर कोहलीनं कसोटी क्रिकेटला मिळत असलेल्या अत्यल्प प्रतिसादावर चिंता व्यक्त केली होती. त्यानं कसोटी क्रिकेटला चालना देण्यासाठी देशातील पाच केंद्रांवर लक्ष केंद्रीत करून तेथेच कसोटी सामने खेळवावेत, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्या या मुद्दावर माजी कसोटीपटू अनील कुंबळे यांनीही मत व्यक्त केले आहे.
अनील कुंबळे हे टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना कोहली आणि त्यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवानंतर कुंबळे यांना पुन्हा प्रशिक्षकपद मिळू नये यासाठी कोहलीनं प्रयत्न केल्याचेही म्हटले गेले. पण, या सर्व चर्चा विसरून कुंबळेंनी कोहलीच्या कसोटी जीवंत ठेवण्याच्या प्रस्तावाला पाठींबा दिला आहे.
ते म्हणाले,''कसोटी क्रिकेटचा प्रसार व प्रचार होण्यासाठी हा योग्य पर्याय आहे. पाच केंद्रांत कसोटी क्रिकेट खेळवण्यास हरकत नाही. चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, मुंबई व कोलकाता हे उत्तम पर्याय आहेत. याच पाच केंद्रांवर कसोटी खेळवली जाईल, याची माहिती सर्वांना द्यायला हवी. त्यानं कसोटी क्रिकेटला गर्दी जमवणंही सोपं होईल. मी जेव्हा प्रशिक्षक होतो, तेव्हा आम्ही सहा विविध केंद्रांवर कसोटी खेळलो. ते सर्व नवीन स्टेडियम होते आणि त्यातील इंदूरमध्ये तुडुंब गर्दी झाली होती.''
कुंबळे पुढे म्हणाले,''प्रेक्षकांना योग्य सुविधा पुरवणेही तितकेच गरजेचे आहे. खाण्याच्या व पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून देणे. आदी गरजेच्या सुविधा पुरवल्यास कसोटी क्रिकेटलाही प्रेक्षक येतील.''