मुंबई : क्रिकेटच्या मैदानात काही वेळा भांडणं किंवा बाचाबाची पाहायला मिळते. भारताचा एक खेळाडू माजी सलामीवीर गौतम गंभीरला थेट मैदानातच भिडला होता. त्यावेळी आताच हिशेब चुकता करून टाक, असेही या खेळाडूने गंभीरला धमकावले होते. या खेळाडूच्या वाढदिवशी त्याचा हा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
फिरोझशाह कोटला येथे २०१५ साली झालेल्या एका सामन्यात हा प्रकार पाहायला मिळाला होता. यावेळी गंभीर आणि हा खेळाडू एकमेकांना भिडले होते. त्यावेळी पंचांनी या दोघांच्या भांडणात हस्तक्षेप केला होता. त्यानंतर गंभीरने या खेळाडूला, ती नंतर भेट, अशी धमकी दिला होती. पण या खेळाडूने घाबरून न जाता गंभीरला आताच मैदानाबाहेर जाण्याचे सांगत हिशोब चुकता करण्याची भाषा केली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा गंभीरला भिडणारा खेळाडू आहे तरी कोण... तर हा खेळाडू आहे मनोज तिवारी. आज मनोजचा ३४वा वाढदिवस आहे.
मनोजचा जन्म १४ नोव्हेंबर १९८५ साली पश्चिम बंगाल येथील हावडा येथे झाला होता. त्यानंतर बंगलाकडून तो रणजी क्रिकेट खेळला. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्सचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारताकडून मनोज १५ सामने खेळला आहे.