अहमदाबाद : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सांघिक खेळी करून भारताने मोठा विजय साकारला. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने शेजाऱ्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चांगली सुरूवात केल्यानंतर पाकिस्तानी संघ गडबडला अन् केवळ १९१ धावांत आटोपला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान व्यतिरिक्त एकाही पाकिस्तानी फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. भारताचा यष्टीरक्षक लोकेश राहुलने अप्रतिम कौशल्य दाखवताना इमाम-उल-हकचा अप्रतिम झेल घेतला. नेहमीप्रमाणे सामन्यानंतर बीसीसीआयने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पदक देऊन त्याचा गौरव केला.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण याची उत्सुकता खेळाडूंमध्ये आहे. नंतर स्क्रीनवर लोकेश राहुलच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दाखला दिला जातो. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या हस्ते पदक देऊन भारतीय यष्टीरक्षकाचा सन्मान करण्यात आला. राहुलला पदक दिल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
भारताची विजयी हॅटट्रिक पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.