सिडनी : क्रिकेटच्या मैदानातील एक भयंकर बातमी आता समोर आली आहे. एका फलंदाजाला बाऊन्सर लागल्याने त्याचे बोट मोडल्याची घटना घडली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून त्याला यापुढे सामन्यात खेळता येणार नाही.
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाने या सामन्यात दमदार आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा एक बाऊन्सर न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या बोटाला लागला. चेंडूचा वेग एवढा जास्त होता की, जेव्हा चेंडू त्याच्या बोटाला लागला तेव्हाच ते फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळाले. ही दुखापत गंभीर असल्यामुळे बोल्टला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले. आता बोल्टवर उपचार सुरु आहे आणि किमान आठवडाभर तरी त्याला विश्रांती घ्यावी लागले. आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा बोल्टची चाचणी घेण्यात येईल आणि त्याच्या संघातील सहभागाबाबत निर्णय घेण्यात येईल.