मॉस्को : आपण जेव्हा दुसऱ्या देशात फिरायला जातो, तेव्हा तिथले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. त्याचबरोबर आपल्याकडून कुठलेही वाईट कृत्य घडणार नाही, याची जाणीवही असायला हवी, नाही तर तुम्हाला तिथल्या जेलची हवा खावी लागू शकते. असा एक प्रसंग घडलाय तो रशियामध्ये आणि जेलमध्ये जाणारा आहे एक फुटबॉल चाहता.
रशियामध्ये मंगळवारी रात्री फुटबॉल विश्वचषकात इंग्लंड आणि कोलंबिया यांच्यामध्ये उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने कोलंबियावर ४-३ असा पेनेल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी एक प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचला. पण त्याने केलेले एक कृत्य त्याला चांगलेच भोवले आणि त्याला पोलीसांनी अटक केली.
मंगळवारी ओटक्रिटी एरेना या मैदानात इंग्लंड आणि कोलंबियाचा सामना होता. या मैदानात रशियाचे दिवंगत फुटबॉलपटू फयोदो चेरेनकोव्ह यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या छातीवर या चाहत्याने लाल रंगामध्ये 'इंग्लंड' असे लिहिले. यानंतर काही चाहत्यांनी ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर पोलिसांनी व्हीडीओ फूटेज पाहून चेरेनकोव्ह यांच्या पुतळ्याचे विडंबन करणाऱ्या त्या चाहत्याला अटक केली.