भारतीय क्रिकेट बोर्ड ( BCCI) हr जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. BCCI ला २०२४-२७ या कालावधीत ICC कडून दरवर्षी सुमारे 2000 कोटी रुपये मिळतील. आयसीसीच्या कमाईच्या ३९ टक्के रक्कम ही बीसीसीआयला दिली जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू झाल्यानंतर बीसीसीआयच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. पण फिफाच्या कमाईसमोर ही कमाई काहीच नाही. FIFA च्या अहवालानुसार २०२३-२६ मध्ये त्यांची कमाई जवळपास ९१ हजार कोटी रुपये असेल. म्हणजेच बीसीसीआयची कमाई १ टक्काही नाही.
बीसीसीआयची कमाई वाढवण्यात आयपीएलने महत्त्वाची भूमिका बजावली. २००६-०७ मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाची कमाई सुमारे ६५२ कोटी रुपये होती. बीसीसीआयची कमाई २०२१-२२ मध्ये सुमारे ४३६० कोटी झाली. यामध्ये आयपीएलमधून सुमारे २२०० कोटींची कमाई झाली. भारतीय क्रिकेट बोर्डाला आयपीएल २०२३-२७ च्या मीडिया हक्कांमधून सुमारे ४८ हजार कोटी रुपये मिळाले. टीव्ही आणि डिजिटल अधिकार स्वतंत्रपणे देण्यात आले. २०२४-२७ दरम्यान आयसीसीची कमाई दरवर्षी सुमारे ४९०० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.
२०१९-२२ मध्ये ६३ हजार कोटींची कमाईफिफाने गेल्या काही दिवसांत वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार, २०१९-२२ मध्ये त्यांची कमाई सुमारे ६३ हजार कोटी होती, जी २०२३-२६ मध्ये ९१ हजार कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी फिफा आपल्या सर्व सदस्यांना सुमारे ६६ कोटी रुपये देणार आहे. खेळ वाढवण्यासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. फिफामध्ये सध्या २००हून अधिक सदस्य आहेत.
आता फिफा महिला फुटबॉल विश्वचषक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात आहे. FIFA कडून या स्पर्धेत सुमारे ९११ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, जी २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेपेक्षा ३०० टक्के अधिक आहे. यामध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. चॅम्पियन संघाला सुमारे ३५ कोटी तर उपविजेत्या संघाला २५ कोटी मिळणार आहेत.