नवी दिल्ली : अर्जेंटिनाच्या संघाने 2022च्या फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि एकच जल्लोष केला. खरं तर अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर फिफा विश्वचषकाचा किताब जिंकला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्याचा उत्साह जगभर पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात मेस्सीच्या संघाने 36 वर्षांचा दुष्काळ संपवत विश्वचषकात तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी देखील या सामन्याचा आनंद लुटला. भारतीय संघाच्या खेळाडूंनी एकाच खोलीत हा सामना पाहिला, ज्याचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. अर्जेंटिनाच्या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी लिओनेल मेस्सीची भुरळ पडली.
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार लोकेश राहुलने देखील या सामन्याचा आनंद लुटला. एका व्हिडिओमध्ये राहुलला एका खेळाडूने विचारले की तू फ्रान्सचा समर्थक आहेस का?, ज्याच्या उत्तरात राहुल म्हणाला की मी मेस्सी समर्थक आहे. त्याचवेळी अर्जेंटिनाच्या विजयानंतर संघाचा सलामीवीर शुबमन गिलने मेस्सीला वेगळ्या पद्धतीने सलाम केला. तो फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादववरही मेस्सीची क्रेझ पाहायला मिळाली. त्याचबरोबर संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहनेही मेस्सीला ट्विटरवर विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय क्रिकेटमधील माजी खेळाडूंनी देखील मेस्सीला खास शुभेच्छा दिल्या. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांपासून वीरेंद्र सेहवाग आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या दिग्गजांचा समावेश होता.
यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही - बुमराहभारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ट्विटच्या माध्यमातून मेस्सीच्या संघाचे कौतुक केले. "आतापर्यंतच्या महान खेळाडूला निरोप देण्यासाठी फुटबॉलचा महान खेळ! सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यापेक्षा जास्त चांगले असू शकत नाही! अभिनंदन", अशा शब्दांत बुमराहने लिओनेल मेस्सीचे कौतुक केले. तर यष्टीरक्षक खेळाडू दिनेश कार्तिकने 'काही गोष्टी ताऱ्यांमध्ये लिहलेल्या असतात' अशा शब्दांत मेस्सीवर प्रेमाचा वर्षाव केला.
एमबाप्पेने रचला इतिहास खरं तर फायनलच्या सामन्यात दोन पेनल्टी वाचवणाऱ्या अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा 'गोल्डन ग्लोव्हज' पुरस्कार देण्यात आला. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवरून त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. जगभरातील चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. 23 वर्षीय एमबाप्पेने हरल्यानंतरही आपल्या खेळाने लोकांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा 'गोल्डन बूट' पुरस्कारही एमबाप्पेने पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे फ्रान्सच्या एमबाप्पेने फायनलमध्ये गोलची हॅटट्रिक करून इतिहास रचला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"