मुंबई : भारताला 1983 व 2011 चा वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघांतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने ( फिफा) विशेष आमंत्रण पाठवले आहे. कतारमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिफाने भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघांना आमंत्रण पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल खाटेर यांनी भारत हा क्रिकेटप्रेमी देश असल्याचे कबुल केले.
क्रिकेट संघांव्यतिरिक्त या स्पर्धेला भारताच्या फुटबॉलपटूंनाही बोलावण्यात येणार आहे. भारतीय संघाने दोन वर्ल्ड कप उंचावले आहेत. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला नमवून बाजी मारली.
भारतीय संघ तिसऱ्या वर्ल्ड कप जेतेपदासाठी सज्ज होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाळी भारतीय संघाला केवळ एकच वन डे मालिका गमवावी लागली आहे आणि त्यामुळेच भारताला वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यजमान इंग्लंडकडून भारताला कडवी टक्कर मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.