ख्राईस्टचर्च - सलामीवीर जॉनी बेयरस्टोच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या वन-डेत न्यूझीलंडचा सात गड्यांनी पराभव करीत मालिका ३-२ ने जिंकली.
न्यूझीलंडने दिलेले २२४ धावांचे लक्ष्य गाठताना बेयरस्टोने ६० चेंडूंत १०४ धावा ठोकल्या. अॅलेक्स हेल्ससोबत (६१ धावा) त्याने सलामीला १५५ धावा वसूल करीत इंग्लंडचा विजय ३२.४ षटकांत तीन बाद २२९ असा साकार केला. बेयरस्टोने नऊ चौकार आणि सहा षटकार खेचले. हेल्सने त्याला साथ देत ७४ चेंडू टोलवून नऊ चौकार मारले. बेन स्टोक्स (२६) आणि ज्यो रुट (२३) यांनी नाबाद राहून विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी मागच्या सामन्यातील शतकवीर न्यूझीलंडचा रॉस टेलर हा फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यानंतर मार्क चॅपमन याला संधी देण्यात आली. इंग्लंडकडून जेसन राय हादेखील पाठदुखीमुळे खेळू शकला नाही. त्याची जागा घेणारा हेल्स याने बेयरस्टोसोबत धावसंख्येला आकार दिला.
न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. ख्रिस व्होक्सने तीन गडी बाद करीत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. कॉलीन मुन्रो (००) आणि कर्णधार केन विल्यम्सन हे झटपट बाद झाले. हेन्री निकोल्स (५५) आणि मिशेल सँटेनर (६७) यांनी सातव्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. इंग्लंडकडून आदिल राशीदने ४२ धावांत तीन, मोईन अली व मार्क वूड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)
Web Title: Fifth ODI: England won the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.