Tim David T20 Blast : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये अपयश आले असले तरी त्यांना काही युवा स्टार मिळाले आहेत.. डेवॉल्ड ब्रेव्हिस, टीम डेव्हिड, हृतिश शोकिन आदी खेळाडूंनी हे भविष्यातील गुंतवणूक असल्याचे मत कर्णधार रोहित शर्माने अखेरच्या साखळी सामन्यानंतर व्यक्त केले होते. टीम डेव्हिडने (Tim David) तर अखेरच्या दोन सामन्यांत चांगलीच फटकेबाजी केली. त्याने आयपीएलमध्ये ८ सामन्यांत २१६.२७ च्या स्ट्राईक रेटने १८३ धावा चोपल्या. तोच फॉर्म कायम राखताना डेव्हिडने ट्वेंटी-२० ब्लास्ट स्पर्धेत लँकशायर ( Lancashire ) क्लबला विजय मिळवून दिला. वॉर्चेस्टरशायरवर ( Worcestershire ) त्यांनी १२ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना लँकशायरने ७ बाद १८३ धावा केल्या. किटन जेनिंग्स ( १६) व फिल सॉल्ट ( २९) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर लँकशायरची मधली फळी ढेपाळली. स्टीव्हन क्रॉफ्ट ( २२), लिएम लिव्हिंग्स्टोन ( २६) व कर्णधार डेन व्हिलास ( ३) हे लगेच माघारी परतले. पण, टीम डेव्हिड खेळपट्टीवर खंबीर उभा राहिला. त्याने २५ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. ल्युक वूडने २२ धावांची त्याला साथ दिली आणि संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पॅट ब्राऊनने तीन व एड बेर्नांर्डने दोन विकेट्स घेतल्या.