Sreesanth VS Gautam Gambhir - गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात बुधवारी लींजंड्स लीग क्रिकेटमध्ये ( LLC) मैदानावर राडा झाला. LLC ही निवृत्त क्रिकेटपटूंची लीग आहे आणि गुजरात जायंट्सकडून श्रीसंत खेळतो आणि इंडियन कॅपिटल्सकडून गंभीर खेळतो... गौतमने जेव्हा षटकार व चौकार लगावला त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. गौतमने या सामन्यात ३० चेंडूंत ५१ धावा केल्या आणि इंडियन कॅपिटल्सला ७ बाद २२३ धावांचा पल्ला गाठून दिला. LLC एलिमिनेटच्या या लढतीत श्रीसंतने ३५ धावा देत १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात गुजरातला ७ बाद २११ धावा करता आल्या आणि त्यांचा १२ धावांनी पराभव झाला.
या वादानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून गंभीरवर आरोप केले. तो म्हणाला,Mr fighter सोबत काय घडले याबद्दल मला काही स्पष्टीकरण द्यायचे नाही. Mr fighter विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा वीरू भाई (वीरेंद्र सेहवाग)सह अनेक लोकांचाही आदर करत नाही. नेमकं तेच झालं. तो मला चिथावत होता आणि अत्यंत असभ्य भाषा त्याने वापरली. त्याने असे बोलायला नको होते.
इथे माझी काहीच चूक नाही. मला हे स्पष्टपणे सांगायचे आहे. मिस्टर गौती काय म्हणाला हे आज ना उद्या तुम्हाला कळेलच.. त्याच्या शब्दांमुळे माझे आणि कुटुंबाचे मन दुखावले गेले आहे. मी माझ्या कुटुंबासोबत बराच संघर्ष केला आहे. आता काही लोकांना विनाकारण माझा अपमान करायचा आहे. त्याने त्या गोष्टी सांगितल्या ज्या त्याला सांगायला नको होत्या, असेही श्रीसंत म्हणाला.
तो पुढे म्हणाला, तुमच्याच सहकाऱ्यांचा आदर नसेल तर संघाचे किंवा लोकांचे प्रतिनिधित्व करण्यात काय अर्थ आहे? कोणत्याही मुलाखतीत जेव्हा त्याला विराटबद्दल विचारले जाते तेव्हा तो कधीच बोलत नाही, काहीतरी वेगळेच बोलतो. मला जास्त तपशिलात जायचे नाही. मला इतकेच सांगायचे आहे की मी खूप दुखावलो आहे. माझे कुटुंब दुखावले आहे. मी वाईट शब्द वापरलेले नाहीत.