राजकोट : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ बुधवारी रंगणारा तिसरा सामनाही जिंकून मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. आजपर्यंत भारताने एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही क्लीन स्वीप नोंदवला नाही. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून विक्रमी कामगिरी करण्याची संधी भारतीयांकडे असेल.
पहिल्या दोन सामन्यांत भारताने आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. तरीही, भारताने दोन्ही सामने सहजपणे जिंकत दमदार कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन होईल. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध क्लीन स्वीप नोंदवला नसल्याने भारताकडे बुधवारी विजय मिळवत विक्रम नोंदवण्याची मोठी संधी आहे. विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाने शानदार लय मिळवली असून, हीच लय कायम ठेवत विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करण्याचा भारतीयांचा प्रयत्न राहील. अखेरच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला विश्रांती दिली आहे.
प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, विराट कोहली, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, सीन एबोट, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेजलवुड, स्पेन्सर जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मिचेल स्टार्क आणि ॲडम झम्पा.
स्मिथच्या फॉर्मची चिंता बाळगू नका : स्टार्क
अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या भारतीय परिस्थितीशी एकरूप होण्यासाठी संघर्ष करीत असला तरी त्याच्या फॉर्मची चिंता बाळगण्याचे कारण नाही, असे वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने मंगळवारी सांगितले. स्मिथ हा भारताविरुद्ध नेहमी मोठी खेळी करतो. तथापि, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत तो क्रमश: ४१ आणि शून्य धावांवर माघारी परतला होता. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यात तो चार कसोटींमध्ये केवळ १४५ धावा काढू शकला.
जखमेतून सावरलेल्या स्टार्कने तिसऱ्या लढतीआधी सांगितले की, स्मिथ शानदार खेळाडू आहे. प्रत्येक प्रकारात संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. आम्ही दक्षिण आफ्रिका दौरा आटोपून भारतात आलो आहोत. अनेकांचे संघात पुनरागमन झाले. सुरुवातीला झालेल्या दोन पराभवांबाबत विचारताच स्टार्क म्हणाला, ‘आमच्या मते दोन्ही सामन्यात खेळपट्ट्यांमध्ये बदल होता. इंदूरमध्ये सायंकाळच्या वेळेस त्रास जाणवला. मोहालीत मात्र विद्युत प्रकाशझोतात आमची कामगिरी चांगलीच झाली.’