मुंबई : सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट वर्तुळामध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चर्चा आहे. धोनीनेही यावेळी काही भावनिक विधानं केलेली आहेत. त्यामुळे काही जणांना धोनीच्या निवृत्तीचा क्षण जवळ आल्याचे वाटत आहे. पण धोनीने मात्र आपण अजूही काही वर्षे क्रिकेट खेळत राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
धोनीने आतापर्यंतच्या आयुष्यातले दोन भावुक क्षण यावेळी सांगितले आहेत. भारताने २०११ साली वानखेडेवर विश्वचषकाला गवसणी घातली होती. यावेळी घडलेली एक गोष्ट धोनीने सांगितली आहे.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतापुढे श्रीलंकेचे आव्हान होते. धोनीने अखेरपर्यंत खेळपट्टीवर राहून विश्वविजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यावेळी ही गोष्ट वानखेडे स्टेडियमवर घडली होती.
धोनी म्हणाला, " वानखेडेवर २०११ साली विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु होता. या सामन्यात आम्ही बराच संघर्ष केला होता. जेव्हा भारतीय संघ विजयासमीप आला होता, तेव्हा एक अविस्मरणीय गोष्ट घडली. भारताला विजयासाठी जवळपास २० धावा हव्या होत्या. त्यावेळी वानखेडेवर 'वंदे मातरम'चा नारा घुमायला सुरुवात झाली. संपूर्ण स्टेडियम 'वंदे मातरम'चा नारा देत होते. हा माझ्यासाठी अद्भूत असाच क्षण होता."
दुसऱ्या भावुक गोष्टबद्दल धोनी म्हणाला की, " भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. या विजयानंतर भारतीय संघाचा वानखेडे स्टेडियमवर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मरीन ड्राइव्ह मी जो जनसमुदाय पाहिला, तो क्षण मी कधीच विससरू शकत नाही. आमची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते."