- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
हैदराबाद आणि चेन्नई हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात खेळतील, हे माझ्या मते योग्यच आहे. दोन्ही संघ आयपीएल गुणतक्त्यात अव्वल दोन स्थानांवर होते. दोन्ही संघांचे १८ गुण होते. हैदराबादचा संघ फक्त नेट रनरेटच्या आधारावर पुढे होता. मात्र दोन्ही संघ बरोबरीलाच होते. दोन्ही संघांतील आपापसांतील लढतीत चेन्नईचा संघ पुढे होता. साखळी फेरीत चेन्नईच्या संघाने दोन्ही सामन्यांत विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात चेन्नई आपल्या चाहत्यांना पहिल्या प्लेआॅफ सामन्याची आठवण देईल. या सामन्यात मानसिकरीत्या चेन्नईकडे आघाडी आहे. मात्र मी नेहमीच म्हणत आलो आहे, की ही आघाडी महत्त्वाची असली तरी अंतिम म्हणजे सामन्याच्या दिवसाचा खेळ आहे. हैदराबादने कोलकाताविरोधात हेच दाखवून दिले आहे. सलग चार सामन्यांतील पराभवानंतर, प्रतिस्पर्धी संघाकडे होम ग्राऊंडवरील समर्थन असतानाही ते सामना जिंकले आहेत. त्यामुळे हैदराबादला कोणीही सहजतेने घेणार नाही, हे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला चांगले माहीत आहे.
या सामन्यातील दोन्ही संघांची तुलना पाहू. चेन्नईची फलंदाजी दमदार आहे. अंबाती रायुडू मागच्या दोन सामन्यांत मोठी खेळी करू शकला नसला तरी शेन वॉटसन, फाफ डू प्लेसीस फॉर्ममध्ये आहे. फाफ डू प्लेसीस याने मागच्या सामन्यात विजय मिळवून दिला. धोनी, रैनादेखील फॉर्ममध्ये आहेत. सीएसकेच्या गोलंदाजीत ढिसाळपणा आहे. याचा फायदा हैदराबादला मिळेल. हैदराबादची फलंदाजी तुलनेने कमकुवत आहे. धवन आणि केन विल्यम्सन लवकर बाद झाले तर मधल्या फळीत दमदार फलंदाज नाही. मागच्या सामन्यात राशिद खानने तुफानी फलंदाजी केली, अन्यथा हैदराबादसाठी कठीण झाले असते. हैदराबादची गोलंदाजी सर्वात मजबूत आहे. जलदगती गोलंदाजी आणि फिरकी उत्तम आहे. चेन्नईची गोलंदाजीदेखील चांगली आहे. हरभजन आणि जडेजा हे फायदेशीर ठरले आहेत, मात्र बळी घेण्यात ते अपयशी ठरले आहेत. अखेरच्या षटकांत चेन्नईचा संघ जास्त धावा देतो.
हैदराबादला फलंदाजीत मजबुती आणण्यासाठी मनीष पांडेसाठी कोणाला तरी बाहेर ठेवावे लागेल. खलील अहमद बाहेर जाईल. मग पाचव्या गोलंदाजासाठी त्यांना कार्लोस ब्रेथवेटवरच अवलंबून राहावे लागेल. पण मला वाटते, की सम प्रमाणात तुल्यबळ संघ आहेत. याआधीचे तिन्ही सामने अटीतटीचे झाले आहेत. सामना पाहण्यात नक्कीच मजा येईल, अंतिम सामन्यातही मला हीच आशा आहे.
राशिद खान अष्टपैलू म्हणून उदयाला येत आहे
या सामन्यात एका खेळाडूने वर्चस्व गाजवले तो म्हणजे राशिद खान. त्याने शनिवारी केलेला खेळ महत्त्वाचा ठरला. तो इम्पॅक्ट प्लेअरप्रमाणे खेळला. त्याने तिन्ही विभागांत चांगला खेळला. फलंदाजीत १० चेंडूंत ३४ धावा केल्या. त्याचे योगदान नसते तर हैदराबादची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचली नसती. आणि त्याने जादूई गोलंदाजी केली. गुगली, लेगस्पिनचा योग्य वापर आणि वेगातील मिश्रणाने फलंदाजांना बुचकळ्यात टाकले. त्याने तीन गडी बाद केले. त्याने दोन उत्तम झेल घेतले. त्याने दबावाच्या वेळीदेखील उत्तम क्षेत्ररक्षण केले. तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयाला येत आहे.
केकेआरने निराशा केली
- कोलकाता नाईट रायडर्सचा संघ खूपच निराश असेल, कारण असे
वाटत होते, की हैदराबादविरोधात शुक्रवारी झालेला सामना
केकेआरच्या हातात आहे. हैदराबादचा संघ फलंदाजीत संघर्ष करीत
होता आणि गोलंदाजीच्या वेळीदेखील केकेआरने १० धावा प्रतिषटक
ही धावगती कायम राखली होती. त्यामुळे १७५ चे लक्ष्य सहज पूर्ण होईल, असे वाटत होते. १०९ धावांवर १ गडी बाद ही स्थिती केकेआरच्या बाजूने होती. त्यानंतर गडी बाद व्हायला सुरुवात झाली आणि उलटफेर झाला. या सामन्यात विशेष बाब म्हणजे हैदराबादच्या खेळाडूंनी आपला विश्वास कायम ठेवला.
- एकवेळ असे वाटत होते, की १४० धावसंख्या होणार नाही मात्र त्यांनी १७४ धावा केल्या. त्यात त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी शानदार खेळी केली. केकेआरच्या होमग्राऊंडवर झालेला हा सामना ते १७-१८ षटकांतच संपवतील असे वाटत होते. केकेआर चार सामने जिंकून या सामन्यात पोहोचले होते, तर सनरायझर्स चार सामन्यांत पराभूत होऊन येथे पोहोचले होते. संपूर्ण परिस्थिती केकेआरच्या बाजूने होती. मात्र टी-२० त हैदराबादच्या गोलंदाजांनी लय पकडली आणि सामना फिरला.
- केकेआरने पराभव का पत्करला, यावर मला वाटते, की सनरायझर्सने नाणेफेक जिंकली होती. मात्र केकेआरच्या संघाला परिस्थिती माहीत होती. त्यांच्याकडे मॅचविनर खेळाडू होते. केकेआरने सुरुवातीला गडीदेखील बाद केले. धवन, केनला बाद केल्यावर केकेआरकडे सामना फिरला होता. मात्र डाव संपायला आलेला असताना केकेआरच्या गोलंदाजीत हवी तशी धार दिसली नाही. केकेआरच्या डावात मला वाटते, की दिनेश कार्तिकचे बाद होणे महत्त्वाचे ठरले, असा शॉट खेळण्याची गरज नव्हती. रॉबिन उथप्पाने रिव्हर्स स्विप खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. तेथेच हैदराबादला सामन्यात परतण्याची संधी मिळाली. हैदराबाद फलंदाजी करीत असताना २०-२५ धावा जास्त मिळाल्या आणि सामना केकेआरच्या बाजूने असताना गडी बाद झाले. टी-२० मध्ये एकही चूक झाली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते.
Web Title: The final match will be exciting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.