नवी दिल्ली : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना लॉर्ड्सवर नव्हे, तर साऊथम्पटनच्या रोझ बाऊल मैदानावर खेळविला जाईल, अशी माहिती बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी दिली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून अंतिम सामना रंगणार आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१ ने नमवून फायनलमध्ये स्थान निश्चित केले होते. कोरोनाची स्थिती पाहता फायनल लॉर्ड्सऐवजी साऊथम्पटन येथे खेळविण्यात येईल. भारताने आधी ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात आणि त्यानंतर इंग्लंडचा मायदेशात पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने फिरकीच्या बळावर प्रत्येकी तीन दिवसांत पाहुण्यांना गुंडाळले होते.विश्व कसोटी मालिकेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला इंग्लंडवर ३-१ किंवा २-१ ने विजय मिळविणे क्रमप्राप्त झाले होते. पहिला कसोटी सामना गमविल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नंतरचे तीनही सामने ओळीने जिंकून जोरदार मुसंडी मारली. अनुभवी रविचंद्रन अश्विनसोबतच अक्षर पटेल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर यांच्या कामगिरीच्या बळावर भारताने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले.
१४ दिवस विलगीकरणात वास्तव्यअंतिम सामना खेळण्याआधी भारतीय संघाला इंग्लंडमध्ये १४ दिवस कठोर विलगीकरणात वास्तव्य करावे लागणार आहे. भारतीय खेळाडू आयपीएलच्या १४ व्या पर्वात ९ एप्रिलपासून व्यस्त होणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळला जाईल. त्यानंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी खेळाडूंना सज्ज होण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. केन विलियम्सनच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध अंतिम सामना खेळण्याआधी नियमानुसार इंग्लंडमध्ये विलगीकरणात वास्तव्य करणे अनिवार्य असेल. सुरुवातीचे ५-६ दिवस कठोर विलगीकरण असेल. नंतर खेळाडू सराव करू शकतील.