मुंबई - बॉलिवूडची नायिका अनुष्का शर्माला भारतीय संघासोबतच्या फोटोनंतर क्रिकेट चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. लंडन येथील भारतीय दुतावासाला भेट देण्यासाठी क्रिकेट संघासोबत अनुष्काही गेली होती. त्यात तिने संघासोबत पहिल्या रांगेत उभे राहून फोटोही काढला. त्यावरून तिच्यावर भरपूर टीका झाली. अखेर तिने मौन सोडले आणि BCCIच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन न झाल्याचे स्पष्ट केले.
BCCIने ७ ऑगस्टला भारतीय संघाचा ग्रूप फोटो ट्विट केला होता. त्यात अनुष्का कर्णधार विराट कोहलीच्या बाजूला उभी होती आणि संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत होता. मात्र इंग्लंड मालिकेत BCCI ने घातलेल्या नियमांनुसार पहिल्या दोन सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नी सोबत राहता येणार नसल्याचे असताना अनुष्का फोटोत दिसल्याने क्रिकेट चाहत्यांनी चौफेर टीका केली. यावेळी BCCI अन्य खेळाडू आणि विराट यांना वेगवेगळी वागणूक देत असल्याचे आरोपही झाले.