Join us  

अखेर निर्णय घेण्याची वेळ आली; कुलदीप की आकाश दीप? रोहितने सर्व खेळपट्टीवर सोडले

धर्मशाला कसोटीत खेळपट्टी पाहून रोहित घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 6:05 AM

Open in App

धर्मशाला : इंग्लंडविरुद्ध येथे ७ मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघात अनुभवी चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव की नवखा वेगवान गोलंदाज आकाश दीप, यांच्यापैकी अंतिम संघात कोणाची वर्णी लागेल, याचा निर्णय खेळपट्टी पाहिल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

आतापर्यंत येथे झालेल्या चार कसोटी सामन्यांत फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले. पूर्वानुभव लक्षात घेत भारत आणि इंग्लंड आपापल्या संघात फिरकी गोलंदाजांना झुकते माप देतील, असा अंदाज आहे. रोहित शर्मा कुलदीपला खेळवेल की आकाश दीपला संधी देईल, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे त्याच्यासाठी स्थान निर्माण करावेच लागेल. त्यामुळे आकाश दीप हा बाहेर बसेल, असेही मानले जात आहे.

रणजी करंडकाच्या सामन्यादरम्यान येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज प्रभावी ठरले होते. एचपीसीएच्या खेळपट्टीवर चार रणजी सामन्यांत वेगवान गोलंदाजांनी १६० पैकी १२० गडी बाद केले. हिवाळा संपल्यानंतर तापमानात वाढ झाली. ७ ते ११ मार्च या कालावधीत सकाळच्या वेळेत वारे वाहताना दिसतील. यामुळे चेंडू सिम होऊ शकतो. हे लक्षात घेत भारतीय संघ किमान तीन वेगवान गोलंदाजांना खेळवू शकतो. तिसरा वेगवान गोलंदाज खेळविल्यास एका फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवावे लागेल. 

  आकाश दीप याने पदार्पणातील सामन्यात ८३ धावांत ३ बळी घेतले. दुसरीकडे रांची कसोटीच्या दुसऱ्या डावात कुलदीप यादवने २२ धावांत ४ गडी बाद करीत विजयात मोलाची भूमिका बजावली होती. पाचव्या सामन्यात या दोघांपैकी कुणाची वर्णी लागेल, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड