India vs South Africa 1st ODI, Jasprit Bumrah: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात यजमानांनी ५० षटकात ४ बाद २९६ धावा केल्या. पार्लच्या मैदानावर आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टेंबा बावुमाने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने १४३ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. तर रॅसी वॅन डर डुसेनने ९६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने नाबाद १२९ धावा केल्या. सामन्यात जसप्रीत बुमराहने तब्बल ९२५ दिवसांच्या अंतराने एक पराक्रम केला.
आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना जानेमन मलानची विकेट खूपच लवकर गमावली. त्याने १० चेंडूत ६ धावा केल्या. पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला यष्टीरक्षक ऋषभ पंतकडून झेलबाद करवले. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल ९२५ दिवसांनी जसप्रीत बुमराहने एक पराक्रम केला. बुमराहने २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत पॉवर प्ले मध्ये विकेट घेतली होती. न्यूझीलंडविरूद्ध त्याने मार्टिन गप्टीलला पॉवर प्लेच्या षटकात माघारी धाडले होते. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये त्यानं २३३ चेंडूंत १७० धावा दिल्या आणि आज विकेट घेतली. पण आजच्या सामन्यात त्याची प्रतिक्षा संपली आणि त्याने पुन्हा एकदा पराक्रम केला.
दरम्यान, या सामन्यात व्यंकटेश अय्यरने वन डे पदार्पण केले. व्यंकटेश अय्यरने IPL 2021 आणि देशांतर्गत क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले. अष्टपैलू खेळाडू म्हणून व्यंकटेश अय्यरकडे पाहिलं जात, पण आजच्या सामन्यात त्याला गोलंदाजीची संधी देण्यात आली नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहची कामगिरी सर्वोत्तम ठरली. त्याने १० षटकात ४८ धावा देत २ बळी टिपले.